महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमुळे सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून या निवडणुकीसाटी मोर्चेबांधणी सुरू आहे. त्याचदरम्यान, राज्यातील दोन पक्षांमध्ये पडलेल्या फुटीमुळे या निवडणुकीत व्हिप कुणाचा चालणार, या पक्षांच्या आमदारांना मतदान कुणाला करावे लागणार याबाबतचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेने निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून महत्त्वपूर्ण माहिती मागवली आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी या महिन्याच्या अखेरीस राज्यसभेची निवडणूक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. सध्याच्या समिकरणांनुसार भाजपाला ३, तर शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक खासदार निवडून येऊ शकतो. मात्र भाजपाने येथे चौथा उमेदवार दिल्यास ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. तपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे मतदानावेळी नेमका व्हिप कुणाचा चालणार, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. तसेच त्याबाबत स्पष्टता यावी यासाठी राज्य विधानसभेने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.
२०२२ मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीनंतर काही दिवसांनी शिवसेनेत फूट पडली होती. तर गतवर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने अनुक्रमे शिंदे गट आणि अजित पवार गट यांना खरे पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. तर सभागृहामध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गट यांना वेगळे गट म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या आमदारांना कुणाचा व्हिप लागू होईल याबाबत संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे राज्य विधानसभेच्या सचिवालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून राज्यसभा निवडणुकीची निवडणूक प्रक्रिया कशी असेल, कुणाचा व्हिप ग्राह्य धरला जाईल, व्हिपचं उल्लंघन केल्यास काय कारवाई होईल, याबाबतची माहिती मागवली आहे.