गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यात रेमडेसिवीरसारख्या औषधांचाही तुडवडा होत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, "रेमडेसिवीर औषध कंपन्यांची राज्य सरकारने मुस्कटदाबी केल्याने महाराष्ट्रात इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. येत्या दोन दिवसात राज्य सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीचा निर्णय घेऊन पुरवठा सुरळीत केला नाही तर मंगळवार २० एप्रिल रोजी कोरोनाबाधित आणि त्यांच्या नातेवाईकांना सोबत घेऊन मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी मोर्चा काढणार आहोत," असा इशारा माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला.साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. "एका बाजूला राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण केल्याने नागरिकांचं बळी जात आहे. दुसऱ्या बाजूला औषध विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे व त्यांचे स्वीय सहाय्यक यांना रेमडीसिवर खरेदीत केवळ कमीशन खायचे असल्याने खरेदी थांबवली गेली आहे. कंपन्यांनी इंजेक्शन केवळ राज्य सरकारलाच विकायचे असा फतवा सरकारने काढला आहे. त्यामुळे कंपन्यांना ते इंजेक्शन मेडिकल दुकानदारांना थेट विकता येत नाही व परिणामी सर्वसामान्य नागरिकांना देखील मिळू शकत नाही," असं खोत यावेळी म्हणाले.
... तर मोर्चाही काढणार"ही बाब अतिशय संतापजनक असून सरकारने स्वतः तात्काळ इंजेक्शन खरेदी करावी व खासगी मेडिकल दुकानदारांनाही विकण्याची मुभा कंपन्यांना द्यावी. जेणेकरून रुग्णांना दिलासा मिळणार आहे. मात्र, सरकार केवळ कमीशन आणि खंडणीसाठी सर्वसामान्य जनतेचे जीव घेणार असेल तर रयत क्रांती संघटना औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांचे पुतळे तर जाळणारच आहे. त्याच बरोबर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घरावर कोरोनाग्रस्त व नातेवाईकांना सोबत घेऊन मोर्चाही काढेल," असा इशारा खोत यांनी दिला.