सांगली : हैदराबाद (आंध्रप्रदेश) येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय किशोर-किशोरी कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर संघाने उपांत्य फेरीत धडक मारली असल्याची माहिती निवड समितीचे सदस्य विजय साळुंखे व तरुण भारत मंडळाचे उपाध्यक्ष महेश पाटील यांनी दिली.सांगलीतील तरुण भारत व्यायाम मंडळात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला. संघाचे सराव शिबिरही तरुण भारत मंडळातच झाले. महाराष्ट्र विरुध्द गुजरात या सामन्यात महाराष्ट्राने गुजरातचा ४३-२० असा २३ गुणांनी धुव्वा उडवला. महाराष्ट्र विरुध्द पंजाब हा अटीतटीचा सामना झाला. अवघ्या तीन गुणांनी महाराष्ट्राने हा सामना जिंकला. तगड्या उत्तराखंडला महाराष्ट्राने १२ गुणाने पराभूत केले. नवख्या तेलंगणाचे कडवे आव्हान महाराष्ट्राने त्यांच्या मायभूमीतच संपुष्टात आणले. ३८-३१ अशा सात गुणांनी तेलंगणाचा पराभव करीत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. राजू कथोरे, सचिन ढवळे, सनी मते यांनी उत्कृष्ट पकडी केल्या. सदाशिव चुरी, अस्लम इनामदार, गणेश आवळे यांनी आक्रमक चढाया केल्या. मुलींमध्ये महाराष्ट्राने कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडवर विजय मिळवला. मुलींच्या संघास उपांत्य फेरीपर्यंत पोहोचता आले नाही. संघ प्रशिक्षक म्हणून सुनील कुंभार व आयुब पठाण, तर व्यवस्थापक म्हणून सरोजिनी चव्हाण व मुजफ्फरअली सय्यद काम पहात आहेत. मदनभाऊंना हैदराबादमध्ये श्रध्दांजली...काँग्रेसचे धडाडीचे नेते व माजी मंत्री मदन पाटील यांना महाराष्ट्राच्या कबड्डी संघाने हैदराबादमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत श्रध्दांजली वाहिली. मदन पाटील हे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष होते.
महाराष्ट्र उपांत्य फेरीत
By admin | Published: October 18, 2015 10:26 PM