मुंबई : दुष्काळ आणि उन्हाच्या तडाख्याने भेगाळलेला महाराष्ट्र रविवारी वळवाच्या जोरदार सरींनी चिंब झाला. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा आला असला, तरीही राजधानी मुंबई अद्यापही ‘चातकी’ आऽऽ वासून आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला़ मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, कोकण-गोव्यात काही ठिकाणी व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ (लोकमत न्यूज नेटवर्क)वळवाच्या पावसाने गेल्या २४ तासांत राज्यभरातील आठ जणांचा बळी घेतला आहे. बुलडाण्यामधील खामगाव तालुक्यातील गारडगाव येथे ज्ञानेश्वर सुपडाजी वाडेकर (२७), अहमदनगर तालुक्यातील अरणगाव येथील दादा शंकर ढमढरे (५५), परभणी जिल्ह्यात सेलू तालुक्यातील नरसापूर आणि जिंतूर तालुक्यातील दत्तराव नरोटे (३५), सूर्यभान तुकाराम मस्के, जालना जिल्ह्यातील परतूर येथील आशामती भगवनाराव खवणे (५०) यांचा वीज पडून मृत्यू झाला. बीडमधील केज तालुक्यात विद्युत खांब अंगावर पडून शेषराव किसनराव गुजर (५५), जालन्यातील मंठा तालुक्यात अंगावर झाड कोसळून देविदास सरोदे (५५) यांचा मृत्यू झाला. सोलापुरातील माढा तालुक्यातील आहेरगाव येथे सुनील पाटील या शेतकऱ्याच्या अंगावर गोठा पडल्याने मृत्यू त्याचा झाला.
वळवाच्या सरींनी महाराष्ट्र चिंब!
By admin | Published: June 06, 2016 3:38 AM