Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : माहीम मतदारसंघात काय होणार, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. या मतदारसंघात मनसेने राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना रिंगणात उतरवले होते. पण अमित ठाकरे पिछाडीवर पडले असून, तिसऱ्या स्थानी गेले आहेत. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. माहीम मतदारसंघात मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि ठाकरे गटाकडून महेश सावंत यांच्यात लढत होती.
विधानसभा निकालावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावरही भाष्य केलं आहे. "शिवसैनिकासाठी शिवसेना कायमच पाठीशी उभी राहिली. समोर कोणीही असलं तरी लढणं हा धर्म असतो. लढलं पाहिजे. नात्यागोत्याचं राजकारण बाजुला ठेवलं पाहिजे" असं म्हटलं आहे. तसेच एका राजपुत्रासाठी जर आम्ही थांबलो तर एका लढणाऱ्या सैनिकावर तो अन्याय होईल. त्यामुळेच महेश सावंतांना उमेदवारी देणं हे सर्वथा योग्य होतं असं म्हटलं आहे.
"आम्ही खूप आधीपासूनच सांगत होतो, महेश सावंत तिकडे विजयी होतील. शिवसेनेची ही खासियत आहे, महेश सावंत यांच्या प्रचारसभेत देखील मी बोलले होते. शिवसेनेने सामान्यातला सामान्य शिवसैनिकावर विश्वास दाखवला. त्या शिवसैनिकासाठी शिवसेना कायमच पाठीशी उभी राहिली. समोर कोणीही असलं तरी लढणं हा धर्म असतो. लढलं पाहिजे. नात्यागोत्याचं राजकारण बाजुला ठेवलं पाहिजे."
"एका राजपुत्रासाठी जर आम्ही थांबलो तर एका लढणाऱ्या सैनिकावर तो अन्याय होईल. त्यामुळेच महेश सावंतांना उमेदवारी देणं हे सर्वथा योग्य होतं. निकाल काहीही लागो. पण महेश सावंतांची उमेदवारी ही आमच्यासाठी महत्त्वाची होती. शिवसेना कायम शिवसैनिकांच्या पाठीशी उभी राहते" असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.