संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत जनतेने महायुतीच्या बाजूने बंपर कौल दिला आहे. राज्यात प्रचंड बहुमताने महायुतीचे सरकार स्थानप होताना दिसत आहे. दरम्यान, आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात अनेकांना प्रश्न पडला आहे. अनेक जण आपापल्या इच्छाही व्यक्त करू लागले आहेत. यातच, महायुतीतील नेत्यांकडूनही मुख्यमंत्रीपदासंदर्भातही प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. मात्र, सर्वांच्या मनातील या प्रश्नाला आता भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच उत्तर दिले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमत्रीपदासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, "यासंदर्भात (मुख्यमंत्री पदासंदर्भात) अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की, मुख्यमत्रीपद हे कुठल्याही निकशावर नाही, तर मुख्यमंत्रीपद हे तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून ठरवतील. एकनाथराव शिंदे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, अजित दादा त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांना आमचे पार्लमेटरी बोर्ड नियुक्त करते. ते बसून जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. कुठलाही वाद नाहीये, कुठलाही विवाद नाहीये.
बघा लाइव्ह ब्लॉग : Watch Live Blog >>
खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाकडे? -यावेळी, खरी शिवसेना आणि खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, "मला असे वाटते की लोकांनी आपला मँडेट दिला आहे. लोकांनी एकनाथ शिंदे यांना खऱ्या शिवसेनेच्या रुपात स्वीकारले आहे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे. तीची वैधता ही एकनाथ शिंदे यांना मिळाली आहे. तसेच, जी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आहे, तिची वैधता अजित पवार यांना मिळाली आहे."