Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्र विधानसभेत भल्या भल्यांचे अंदाज हुकले आहेत. काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार जिंकण्यासाठी मोठा संघर्ष करत आहेत. तर महायुतीचे जे विजयी होण्याची शक्यता ५०-५० होती ते देखील मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याच्या मार्गावर आहेत. अशातच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण यावरून महायुतीत स्पर्धा तीव्र होऊ लागली आहे.
महायुतीला २२० जागांवर बहुमत मिळत आहे. तर काही अपक्षही महायुतीचेच आहेत. यामुळे हा आकडा सव्वा दोनशेपार जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला तर आता विरोधी पक्षनेतेपद टिकविण्यासाठी स्पर्धा करावी लागणार आहे. कारण त्यांना ५५ च्या आसपास जागा मिळताना दिसत आहे. सर्वाधिक जागा या भाजपाच्या येत आहेत. भाजपा १२८, शिंदे ५३ आणि अजित पवार ३६ असे बलाबल होत आहे.
जागांच्या जोरावर भाजपाचा मुख्यमंत्री होणार की महाराष्ट्रात बिहार मॉडेल वापरले जाणार असा प्रश्न पडू लागला आहे. बिहारमध्ये भाजपाचे सर्वाधिक आमदार असले तरीही ज्यांच्या नेतृत्वात सरकार आले त्या नितीशकुमारांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्यात आले होते. यानुसार महाराष्ट्रातही शिंदेंच्या नेतृत्वात सरकार आले म्हणून पुन्हा त्यांनाच मुख्यमंत्री केले जाण्याची देखील शक्यता आहे.
दुसरीकडे भाजपाची धक्कातंत्राची रणनिती पाहता नव्याच चेहऱ्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची संधीही नाकारता येत नाही. परंतू, असे झाले तर कोण मुख्यमंत्री होणार? शिंदे शिवसेना, भाजपा या दोन हिंदुत्ववादी आणि अजित पवारांचा पक्ष धर्मनिरपेक्ष अशा दोन बाजुंना सांभाळणारा नेता कोण असेल, असाही प्रश्न भाजपसमोर आहे. कदाचित मुख्यमंत्री बनण्याची इच्छा अधुरी असलेले अजित पवारही मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे. तीन पक्ष आणि तिन्ही इच्छुक असल्याने महायुतीने ही निवडणूक मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर न करताच लढविली होती. यामुळे आता मुख्यमंत्री कोण होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.