मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कुस्तीवरुन वाकयुद्ध रंगलं होतं. साताऱ्यातल्या सभेत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या तोंडात कुस्ती, पैलवान शब्द शोभत नाहीत, असा टोला लगावला होता. त्याला आता मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्या पैलवानाचे 54 आले आणि माझे 105 आले, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पवारांवर पलटवार केला. विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपामध्ये मेगाभरती सुरू होती. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपात दाखल झाले. त्यावर भाष्य करताना आता पवारांसोबत कोणीही शिल्लक राहिलं नाही. आमचे पैलवान तेल लावून आखाड्यात उतरले आहेत. मात्र समोर कोणी पैलवानच दिसत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पवारांवर निशाणा साधला होता. यानंतर कुस्ती आणि पैलवान शब्दांवरुन मुख्यमंत्री आणि पवारांमध्ये चांगलीच जुंपली होती. विधानसभा निवडणुकीआधी अनेक आमदार भाजपात गेले असले तरीही राष्ट्रवादीनं चांगली लढत दिली. त्यावरुन अनेकांनी शरद पवारांच्या विजिगीषू वृत्तीचं कौतुक केलं. त्यावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी पवारांना टोला लगावला. 'कोण त्यांना (पवारांना) मॅन ऑफ द मॅच म्हणतंय. कोण मॅन ऑफ द सीरिज म्हणतंय. पण सरकार कोणाचं स्थापन होतं हे महत्त्वाचं असतं,' असं मुख्यमंत्री म्हणाले. शिवसेनेनं सत्तेच्या समान वाटपाचा आग्रह लावून धरला आहे. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही तडजोड होणार नसल्याचा स्पष्ट इशारा देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिला आहे. अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद देऊ, असं कधीच कबूल केलं नव्हतं. 1995चा फॉर्म्युला येईल वगैरे असं काहीही होणार नाही, सीएमपदासाठी प्रस्ताव आला होता, पण अशी कुठलीही बातचीत झाली नाही, असं अमित शहांनी मला सांगितल्याचा खुलासाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
महाराष्ट्र निवडणूक 2019: निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्र्यांचा कुस्तीवरून पवारांना टोला; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 1:39 PM