महाराष्ट्र निवडणूक 2019: आणखी एका अपक्ष आमदाराचा भाजपाला पाठिंबा; सत्ता स्थापनेआधी दबावाचं राजकारण जोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 10:51 AM2019-10-29T10:51:56+5:302019-10-29T11:06:43+5:30
शिवसेना, भाजपाचं दबावतंत्र; एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न
मुंबई: निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन चार दिवस झाले तरी अद्याप सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेनेकडून दबावाचं राजकारण केलं जात आहे. सत्तेच्या वाटाघाटीत आपलं सामर्थ्य वाढावं यासाठी दोन्ही पक्ष अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवताना दिसत आहेत. गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांनी भाजपाला पाठिंबा देत असल्याचं पत्र मुख्यमंत्र्यांकडे सोपवलं आहे.
विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. शिवसेना, भाजपाच्या महायुतीला 161 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे महायुती सत्ता स्थापन करू शकते. मात्र सरकारमध्ये समान वाटा मिळावा, असा आग्रह शिवसेनेनं धरला आहे. सत्तेचं समान वाटप करा, अन्यथा अन्य पर्याय खुले आहेत, असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर दबाव टाकला आहे. तर शिवसेनेचे तब्बल 45 आमदार संपर्कात असल्याचा दावा करत भाजपानं खळबळ उडवून दिली आहे.
सत्ता स्थापन करण्यासाठी 145 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. सध्या भाजपाचे 105 आमदार आहेत. तर शिवसेनेचे 56 उमेदवार निवडून आले आहेत. प्रहारच्या बच्चू कडूंनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. तर आमदार रवी राणांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. याशिवाय इतर अपक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपा, शिवसेनेत चढाओढ पाहायला मिळत आहे. सरकार स्थापनेच्या चर्चेत आपलं पारडं जड ठरावं यासाठी दोन्ही पक्षांचे नेते सध्या कामाला लागले आहेत.