मुंबई: महाराष्ट्रात कोणीही दुष्यंत चौटला नाही, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपाला सूचक इशारा दिला आहे. ज्याचे वडील तुरुंगात आहेत असे दुष्यंत चौटाला महाराष्ट्रात नाहीत, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना सत्तेच्या समान वाटपावर ठाम असल्याचा संदेश त्यांनी या इशाऱ्यातून दिला आहे.हरयाणात बहुमतापासून दूर राहिलेल्या भाजपानं निकालानंतर दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपीशी आघाडी केली. यानंतर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले दुष्यंत चौटाला यांचे वडील अजय चौटाला फर्लोवर बाहेर आले. यावरून शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला. 'महाराष्ट्रात कोणीही दुष्यंत चौटाला नाहीत, ज्याचे वडील तुरुंगात आहेत. आम्ही महाराष्ट्रात सत्याचं राजकारण करतो. त्यामुळे जर कोणी आम्हाला सत्तेपासून दूर ठेवत असेल, तर त्याला सत्याचं राजकारण म्हणता येणार नाही. सध्या काय घडतंय आणि माणसं किती खालच्या थराला जात आहेत, याकडे आमचं लक्ष आहे,' असं म्हणत राऊत यांनी भाजपाला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. त्याआधी काल शिवसेना नेते दिवाकर रावतेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील राज्यपालांच्या भेटीसाठी पोहोचले. शिवसेना, भाजपाचा सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजपाला लोकसभेवेळी निश्चित झालेल्या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली आहे. भाजपा आम्हाला दिलेल्या आश्वासनाकडे पाठ फिरवू शकत नाही. भाजपानं आमच्यासोबत करार केलेला आहे. त्याचा सन्मान ठेवला पाहिजे. ते आम्हाला आश्वासन देऊन मागे हटू शकत नाही, अन्यथा आम्ही दुसऱ्या पर्यायांचा विचार करू, असा सूचक इशारा राऊत यांनी दिला आहे.
महाराष्ट्र निवडणूक 2019: महाराष्ट्रात कोणीही दुष्यंत चौटाला नाही; शिवसेनेचा भाजपावर बाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 12:50 PM