Maharashtra Assembly Election Results : सुरुवातीच्या कलात काँग्रेसला धक्का; बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम पिछाडीवर!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 10:32 AM2024-11-23T10:32:33+5:302024-11-23T10:38:32+5:30
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : सुरुवात पोस्टल मतमोजणीपासून झाली. त्यानंतर प्राथमिक कल हाती येऊ लागले. यामध्ये काँग्रेसच्या बड्या नेत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे.
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. सुरुवात पोस्टल मतमोजणीपासून झाली. त्यानंतर प्राथमिक कल हाती येऊ लागले. यामध्ये काँग्रेसच्या बड्या नेत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे.
(Maharashtra Election Results 2024)
विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे विजय वड्डेटीवार, बाळासाहेब थोरात, विश्वजीत कदम हे तीन नेते पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार सध्या राज्यातील २८८ विधानसभा जागांपैकी एक असलेल्या ब्रह्मपुरी मतदारसंघाचे आमदार आहेत. ब्रह्मपुरी मतदारसंघामधून काँग्रेसचे विजय वड्डेटीवार विरुद्ध भाजपचे कृष्णलाल सहारे अशी लढत होती. या मतदारसंघातून विजय वड्डेटीवर पिछाडीवर असल्याचे सुरुवातीच्या कलात पाहायला मिळाले.
संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ यांच्यात लढत होती. या मतदारसंघातून बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत. तर काँग्रेसचे सांगलीत फायरब्रँड नेते विश्वजीत कदम पिछाडीवर आहेत. पलूस कडेगाव मतदार संघातून विश्वजीत कदम यांच्याविरोधातील भाजप उमेदवार संग्राम देशमुख आघाडीवर असल्याचे चित्र आहे. हे सुरुवातीचे काही कल आहेत.
दरम्यान, सुरुवातीच्या कलात विधानसभेच्या २८८ जागांपैकी पैकी १६३ जागांवर महायुती पुढे आहे. तर ११० जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. भाजप १०२ जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना शिंदे गटाचे ३८ उमेदवार पुढे आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट २७ उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेस ३२ जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना ठाकरे गट २४ जागांवर आघाडीवर आहे. ३८ जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गट आघाडीवर आहेत.