आमदारांच्या फुटबॉल मॅचमध्ये मुख्यमंत्र्यांची कॉमेंट्री तर तावडे झाले रेफ्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 09:28 PM2017-08-10T21:28:33+5:302017-08-10T21:29:38+5:30
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेकदा जुंपल्याचं आपण पाहिलंय. पण आज महाराष्ट्र विधानभवनाच्या आवारात वेगळंच चित्रं पाहायला मिळालं.
मुंबई, दि. 10 - सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेकदा जुंपल्याचं आपण पाहिलंय. पण आज महाराष्ट्र विधानभवनाच्या आवारात वेगळंच चित्रं पाहायला मिळालं. विरोधक आणि सत्ताधारी आज एकत्र आले होते. महाराष्ट्र विधानभवनाच्या आवारात आज अध्यक्ष इलेव्हन विरुद्ध सभापती इलेव्हन असा आमदारांच्या दोन संघांमध्ये फुटबॉल सामना रंगला. महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सामन्याचं समालोचन केलं.
विधानभवनच्या पार्किंग एरियामध्ये हा फुटबॉल सामना खेळवण्यात आला. सभापती 11 विरुद्ध अध्यक्ष 11 म्हणजेच विधानसभा विरुद्ध विधानपरिषद असा हा सामना होता.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुटबॉलला किक मारून सामन्याचा शुभारंभ केला. या सामन्यासाठी समालोचन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तर शिक्षण मंत्री विनोद तावडे या सामन्यासाठी रेफ्री होते.
ऑक्टोबर महिन्यात भारतात जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा) १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा होणार आहे. यानिमित्ताने फुटबॉलला चालना मिळावी यासाठी या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये होणारी ही पहिलीची फिफाची विश्वचषक स्पर्धा असणार आहे. भारतात फुटबॉलला चालना मिळावी यासाठी या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या ऐतिहासिक स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण देशात क्रीडा-क्रांती रुजविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.