महाराष्ट्रातील प्राध्यापकांना पंजाबतर्फे ‘जी आया नू’
By admin | Published: June 11, 2015 01:29 AM2015-06-11T01:29:57+5:302015-06-11T01:29:57+5:30
मी तब्बल ३० वर्षांनंतर महाराष्ट्रात पुन्हा आलो आहे. या मराठी मातीचा काय गुण आहे कळत नाही, पण इथे आल्यानंतर मनाला फार मोठे समाधान मिळते.
संत नामदेव पुरस्काराच्या निमित्ताने महाराष्ट्रात आल्यानंतर कसे वाटते आहे?
मी तब्बल ३० वर्षांनंतर महाराष्ट्रात पुन्हा आलो आहे. या मराठी मातीचा काय गुण आहे कळत नाही, पण इथे आल्यानंतर मनाला फार मोठे समाधान मिळते. यापूर्वीही मला असाच अनुभव आला होता. संत नामदेव अध्यात्माची पताका घेऊन पंजाबात आले, तर गुरू गोविंदसिंग महाराष्ट्रात नांदेड येथे आले होते. महाराष्ट्र आणि पंजाबचे हे नाते दृढ व्हावे, यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची इच्छा आहे.
त्या दिशेने आपण काही पावले उचलली आहेत का?
- पंजाबमधील विद्यापीठामध्ये संत नामदेव अध्यासन सुरू केले आहे. संत नामदेवांचा व संत साहित्याचा अभ्यास असणाऱ्या महाराष्ट्रातील प्राध्यापकांचे तिथे स्वागत आहे. महाराष्ट्रातून संत साहित्याच्या अभ्यासकांनी तिथे येऊन आमच्या विद्यार्थ्यांना शिकवावे. दोन्ही राज्यांमध्ये सांस्कृतिक, आध्यात्मिक आदानप्रदान व्हावे, असे मला वाटते.
तुम्ही हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाला भेट दिलीत, त्यामागची भावना काय होती ?
- भारतीय स्वातंत्र्ययुद्धात पंजाब व महाराष्ट्राचा फार मोठा वाटा आहे. राजगुरू, विष्णू गणेश पिंगळे ही क्रांतिकारक मंडळी पंजाबात आली होती. मी त्यांच्या वारसांना भेटलो. त्यांना स्वत:साठी काहीही नको. हुतात्मा झालेल्या आपल्या पूर्वजांचे नाव कायम राहावे, एवढेच त्यांना हवे आहे.
सैन्य दलात शीख बांधव नेहमी आघाडीवर कसे असतात?
- शिखांचा स्वभावच लढाऊ आहे. कोणत्याही लढाईत शीख नेहमीच संख्येने जास्त असतात, हा इतिहास आहे. स्वातंत्र्ययुद्धातही शिखांचा मोठा सहभाग होता. अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारेही शीखच जास्त. आम्हाला त्याचा अभिमान आहे.
देशातील धार्मिक उन्मादाच्या वातावरणास भाजपाला जबाबदार धरले जात आहे; त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
- पंजाबातील भाजपाबरोबरची आमची युती ही राजकीय घटना आहे. सर्व धर्मांबाबत आम्हाला आदरच आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक भारतीयानेही दुसऱ्याच्या धर्माबाबत असाच आदर बाळगला पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे.
पंजाबातील दहशतवादाची सद्य:स्थिती काय आहे?
- पंजाबने खूप वाईट दिवस पाहिले आहेत. देशातील अशांत प्रांत म्हणून पंजाब ओळखला जात होता. त्या अस्थिरतेतून आता आम्ही बाहेर आलो आहोत. आज देशातील सर्वात शांत, सामाजिक सलोखा जपणारा व तितकाच समृद्ध प्रांत म्हणून पंजाब पुन्हा ओळखला जाऊ लागला आहे.
प्रांतभेद आणि जातीय राजकारण संपवण्यासाठी काय करायला हवे?
- देशातील संतांचे विचारच आपल्या देशाला तारू शकतात. गुरुवाणीनुसार आपले आचरण राहिले तर कसलेही वाद होणार नाहीत, भांडणे होणार नाहीत. परस्परांचा संवाद वाढवला पाहिजे.
देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री ते आताचे देशातील सर्वात ज्येष्ठ मुख्यमंत्री असे दोन्ही विक्रम तुमच्या नावावर आहेत. इतक्या वर्षांच्या राजकीय कारकिर्दीबाबत काय वाटते?
- काम करण्याची मला आवड आहे, मी ते करीत आलो आहे. देशातील राजकारणाची शैली बदलली आहे, मात्र तो काळाचा परिणाम आहे.
काही गोष्टी आहेत, मात्र त्याविषयी आता बोलता येणार नाही. शरद पवार यांच्याबरोबरची मैत्री तर राजकारणाच्या पलीकडची आहे. राज ठाकरे यांची युवकांमध्ये क्रेझ आहे. त्यांना मी पंजाबला येण्याचे खास निमंत्रण दिले आहे.