Video: पंकजाताईंचं तिकीट कापलं, तेव्हा ‘धनुभाऊं’ना काय वाटलं?... ऐका त्यांच्याचकडून
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 06:00 PM2020-06-11T18:00:42+5:302020-06-11T18:01:38+5:30
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, धडाडीच्या नेत्या पंकजा मुंडे , विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या चौघांचं विधानपरिषदेचं तिकीट ...
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, धडाडीच्या नेत्या पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या चौघांचं विधानपरिषदेचं तिकीट कापण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या निर्णयामुळे भाजपामध्ये फूट पडेल, बंड होईल, अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती. विशेषतः खडसे आणि पंकजाताई काय करतात, याबद्दल उत्सुकता होती. मात्र, थोडा राग आणि नाराजी व्यक्त करून ते शांत झालेत. त्यांना तिकीट मिळायला हवं होतं, असं त्यांच्या समर्थकांना वाटणं स्वाभाविकच आहे; पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे मंत्री आणि पंकजाताईंचे बंधू धनंजय मुंडे यांनीही काहीशी तशीच भावना व्यक्त केली आहे.
उमेदवारी का दिली नाही, हा भाजपाचा पक्षांतर्गत विषय आहे. पण, एखादा मंत्री पराभूत होतो, तेव्हा त्या नेत्याला पुनर्जीवित करण्यासाठी आमदारकी देणं, विधानपरिषदेवर घेणं गरजेचं आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारली तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला, असं धनंजय मुंडे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं.
आईंना,ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,'तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही' बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजप च्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद!
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) May 8, 2020
‘‘गोपीनाथ मुंडेंना दिलेला त्रास सगळ्यांना माहीत आहे!’’
भाजपाने पंकजा मुंडेंचं तिकीट कापलं असलं तरी डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेवर, तर गोपीनाथ मुंडेंचे समर्थक रमेश कराड यांना विधानपरिषदेवर पाठवून वंजारी समाजाला प्रतिनिधित्व दिलं आहे. याकडे लक्ष वेधलं असता, त्याचा फारसा फायदा भाजपाला होणार नसल्याचं मत धनंजय मुंडेंनी मांडलं. मी भाजपामध्ये होतो, त्याला बराच काळ लोटलाय. आता भाजपामध्ये नवं पर्व सुरू झालंय. त्यांनी राज्यसभेत किंवा विधानपरिषदेत वंजारी समाजाला कितीही प्रतिनिधित्व दिलं, मंत्रीच काय, पण मुख्यमंत्री वंजारी समाजाचा केला; तरी या समाजाचा जनाधार त्यांनी गमावला आहे. गोपीनाथ मुंडेंना पक्षाने काय त्रास दिला, कशा पद्धतीची वागणूक दिली, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे वंजारी त्यांच्यासोबत जाणार नाहीत, असा दावा धनंजय मुंडेंनी केला.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून आक्रमकपणे भूमिका मांडणारे आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य खात्याचे मंत्री धनंजय मुंडे कोरोना संकटाच्या काळात फारसे प्रकाशझोतात नव्हते. आपल्या जिल्ह्यात राहून आपण काम करत होतो, असं त्यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेता असताना जी आक्रमकता आपण पाहिलीय, तशी मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार नाही. मात्र, उपेक्षित, वंचितांना न्याय देण्याच्या दृष्टीने या खात्याचा अभ्यास, नियोजन केल्याचं ते म्हणाले. सामाजिक न्याय खात्याच्या कुठल्याही योजनेच्या आर्थिक तरतुदीला कात्री लागू नये, यासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
पाहा धनंजय मुंडेंची संपूर्ण मुलाखतः
आणखी वाचाः
राष्ट्रवादीने विधान परिषदेच्या आमदारकीची दिलेली ऑफर स्वीकारणार?; राजू शेट्टींनी केला मोठा खुलासा
'मुलगा कितीही पुढे गेला तरी बापाला वाटतं त्याला कमी समजतं'; फडणवीसांचा पवारांवर निशाणा
सर्कशीत आता प्राणी नसतात, सर्व जोकर असतात; माजी मुख्यमंत्र्यांचं शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर
आमच्या सर्कशीत प्राणी आहेत पण विदूषकाची कमी; शरद पवारांचा राजनाथ सिंहांना टोला
'नरेंद्र मोदींनी आमच्याबाबतही प्रेमाचा दृष्टीकोन ठेवावा'; शरद पवारांनी व्यक्त केली अपेक्षा