नुकत्याच झालेल्या राज्यातील सुमारे २३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या युतीने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसले होते. या तिन्ही पक्षांनी समर्थन दिलेल्या पॅनेलनी १४०० हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये वर्चस्व मिळवले होते. दरम्यान, या यशानंतर महायुतीमधील नेत्यांचा आत्मविश्वाच चांगलाच वाढलेला दिसत आहे. महायुती आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ तर विधानसभा निवडणुकीत २१५ जागा जिंकेल असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा संदर्भ देत उदय सामंत म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीत आपणं पाहिलं की, २३०० ग्रामपंचायतींपैकी १४०० पेक्षा जास्त सरपंच हे महायुतीचे निवडून आले. साडे चारशे जे इतर सरपंच निवडून आले आहेत. त्यापैकी सव्वाशे ते दीडशे सरपंच हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तर तेवढेच सरपंच भाजपा आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. ग्रामीण भागातील जनतेनं महायुतीला स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळे खासदारकी आणि आमदारकी आमच्यादृष्टीने फार सोपी आहे. लोकसभेमध्ये आम्ही ४५ जागा जिंकू आणि विधानसभेच्या २१५ जागा आम्ही जिंकू, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.
निधीवरून नाराजी आहे का असं विचारलं असता उदय सामंत म्हणाले की, निधिवाटपावरून कुणी नाराज असेल असं मला वाटत नाही. महायुतीमध्ये गैरसमज निर्माण व्हावा. महायुतीतील घटक पक्षांमध्ये दुरावा निर्माण व्हावा, असं यामधून काही लोकांना वाटतं. मात्र असं काहीही होणार नाही, असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.