मुंबई - दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 14 जानेवारी रोजी मकर संक्रांती सगळीकडे साजरी केली जाणार आहे. मात्र यावेळची मकरसंक्रांती विशेष आहे. कारण 17 वर्षानंतर रविवार आणि संक्रांतीचा योग जुळून आला आहे. याआधी 2001 मध्ये हा योग आला होता. यावर्षी दोन दिवस मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे. 14 जानेवारीला दुपारी 1 वाजून 47 मिनिटांनी सुर्य मकर राशीत प्रवेश करेल त्यानंतर 15 जानेवारीला सकाळी 5 वाजून 11 मिनिटांपर्यंत संक्रांत असेल. रविवारचा कारक ग्रह सूर्य असून हा सणही सूर्यदेवाचा आहे. यामुळे 2018 च्या मकर संक्रांतीचे महत्त्व अधिकच वाढले आहे
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य दक्षिण दिशेहून उत्तर दिशेत जातो त्यानंतर खरमास सप्ताह असतो. खरमास संप्ताहात कुठलीही चांगली कामं करू नये, पण खरमास सप्ताह संपल्यानंतर शुभ कामांचा योग सुरू होतो. शास्त्रानुसार, उत्तरायणच्या दिवसाला देवांचा दिवस व दक्षिणायनच्या दिवसाला देवांची रात्र म्हंटलं जातं. अशा प्रकारे मकर संक्रांतीला एकाप्रकारे देवतांची सकाळ मानली जाते.
महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (13 जानेवारी), संक्रांती (14 जानेवारी) व किंक्रांती (15 जानेवारी) अशी नावे आहेत. संक्रांत म्हणजे काय? आणि या संक्रांतीला 'मकर संक्रांत' असं का म्हणतात. संक्रांत म्हणजे संक्रमण, मार्ग क्रमून जाणे किंवा ओलांडून जाणे. तसं म्हटलं तर प्रत्येक महिन्यांतच संक्रांत येत असते. म्हणजेच सूर्याचे एका राशीतून दुसर्या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो. संक्रांतीचा आदला दिवस हा भोगी म्हणून साजरा करतात. या दिवशी तीळमिश्रीत पाण्याने स्नान करायचे. तीळाची भाकरी, वांग्याचे भरीत अन् मिश्र भाजी करण्याची प्रथा आहे. तिळाची गरम गरम भाकरी, भरीत, चविष्ट भाजी, सोबत लोणी, असा विशेष बेत असतो. संक्रांतीचा आणखी एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे ज्याप्रमाणे आपण दसर्याला मोठ्या लोकांना आपट्याची पाने देऊन त्यांचे आशीर्वाद घेतो. त्याचप्रमाणे संक्रांतीलाही तिळगूळ वाटून नात्यांमधील गोडवा आणखी वाढवा, यासाठी 'तिळगूळ घ्या अन् गोड गोड बोला' असा संदेश थोरामोठ्यांना दिला जातो. 'माणसं तोडू नका तर माणसं जोडत जा' हाच संदेश हा सणाच्या माध्यमातून दिला जातो. सांस्कृतिकदृष्टया या सणाचे फार महत्त्व आहे. लोक एकमेकांना तिळगूळ देतात व 'तिळगूळ घ्या - गोड बोला' असे म्हणतात. आपली जुनी भांडणे-वैरे विसरून, पुन्हा स्नेहाचे, सलोख्याचे संबंध निर्माण करण्यासाठी ही मोठी संधीच असते जणू. ज्यांचे संबंध चांगलेच आहेत, त्यांचे संबंध अधिक दृढ होण्यासाठी याचा उपयोग होतो.
संक्रांतीच्या दिवशी दानाला विषेश महत्त्वमकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान, जप, तपाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या दानाची दान करणाऱ्याला परतफेड मिळतेच असं बोललं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी तूप, तीळ, खिचडी या दानाला खास महत्त्व आहे. प्रत्येक राशीनुसार दान असल्याचं बोललं जातं. संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने प्रत्येक राशीवर त्याचा वेगळा परिणाम होतो, म्हणून राशीनुसार दान करावं, असं तज्ज्ञ सांगतात.
काळ्या वस्त्रांचे महत्त्वसंक्रांतीच्या दिवशी काळया वस्त्रांना महत्त्व दिले जाते. कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात. म्हणून काळया साडया, काळी झबली, अशी वस्त्रे संक्रांतीच्या सुमारास कापड बाजारात दिसू लागतात. नवविवाहित मुलींसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. लग्नानंतरच्या प्रथम येणा-या संक्रांतीला नवविवाहित मुलींसाठी खास काळया रंगाच्या वस्त्रांची खरेदी केली जाते. त्यांना हलव्याचे दागिने घालतात व सुवासिनींना हळदीकुंकवासाठी बोलावतात. त्यांना तिळगुळाच्या वडया किंवा तीळ आणि साखरेपासून बनवलेला हलवा देतात. एखादी उपयुक्त वस्तू सुवासिनींना भेट म्हणून दिली जाते. त्याला 'आवा लुटणे' असे म्हणतात.
लहान मुलांचे 'बोर न्हाण' संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी लहान मुलांचे 'बोर न्हाण' केले जाते. यावेळी लहान मुलांना भोवताली बसवून मध्ये पाटावर बाळाला बसवतात. त्याला काळं झबलं, अंगावर हलव्याचे दागिने, डोक्यावर मुकुट, मुरली या अन् अशा अनेक प्रकारच्या हलव्याच्या दागिन्यांची बाळाला सजवतात. त्याच्या डोक्यावरून कुरमुरे, बोरं, चॉकलेट, गोळ्या या सारख्या मुलांना आवडणार्या पदार्थांचा अभिषेक केला जातो.
पतंगोत्सवमकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचीही प्रथा आहे. यामागे एक विशिष्ट अर्थ आहे. सामान्यपणे पतंग उडवण्यासाठी घराच्या छतावर किंवा मैदानात जावे लागते. यामुळे सहजच आपण कोवळ्या उन्हाचाही आनंद मिळतो. संक्रांतीच्या दिवशी ज्या प्रकारे आकाशात लाल, पिवळ्या, निळ्या रंगांची पतंग उडताना दिसतात.