- मनोहर कुंभेजकर
मुंबई : पालकांच्या परवानगीशिवाय आंतरजातीय विवाह करणा-या मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१ वर्ष करावे अशी आग्रही मागणी उत्तर मुंबई भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आजच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत लोकसभेच्या शून्य प्रहर काळात केली आहे. खास दिल्लीवरून त्यांनी लोकमतशी संपर्क साधून आपली यामागील भूमिका स्पष्ट केली. सगळीकडे ८ मार्च हा दिवस ' जागतिक महिला दिन ' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी उल्लेखनीय काम केलेल्या महिलांचा सत्कार केला जातो. मात्र शेट्टी यांच्या या मागणीमुळे योग्य वयात जीवनातील महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार या महिलांना मिळेल अशी अशा त्यांनी व्यक्त केली.
याबद्दल अधिक बोलताना ते म्हणाले की, जर स्त्री तिच्या वयाच्या १८ व्या वर्षी तिच्या कुटुंबियांच्या संमतीने विवाह करत असेल तर अशा विवाहास कोणताही आक्षेप घ्यायची गरज नाही. एखादी स्त्री जर आपल्या पाल्यांच्या संमतीशिवाय आंतरजातीय प्रेमविवाह करत असेल तर अशा मुलीची लग्नाची वयोमर्यादा २१ वर्षांपर्यंत करावी. अनेकदा असे दिसून येते कि, अनेक मुली प्रेमाच्या भरात कमी वयात लग्न करतात आणि असे करून त्या आपल्या आयुष्याचे नुकसान करून घेण्याची शक्यता अधिक असते.
शेट्टी म्हणतात की, आंतरजातीय प्रेम विवाहात मुलींनी १८ वर्षे वयात लग्नासारख्या महत्वपूर्ण निर्णय घेणे योग्य नाही.कारण या अजाणत्या वयात कोण योग्य आणि काई अयोग्य याची कल्पना या मुलींना नसते. भारत सरकारला एक नवीन आणि सुयोग्य कायदा लागू करण्याची चांगली संधी असून याचा फायदा देशातील महिलांना होऊन त्या आत्मनिर्भर होतील असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.