मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची शनिवारी बीडमध्ये 'निर्णायक इशारा सभा' पार पडली. या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्याबाबत मोठी घोषणा केली आहे. २० जानेवारपासून मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहे. मला भेटण्यासाठी राज्यातील तीन कोटी मराठे येणार आहेत. त्यांना आडवून दाखवा असा इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका घेतली आहे. या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य करताना संयम बाळगावा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांना केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "आताच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाला आहे, क्युरेटिव्ह पिटीशन २४ जानेवारीला न्यायालय ऐकणार आहे. आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने मराठा समाजासाठी हा फार मोठा दिलासादायक निर्णय आहे. मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी वकीलांची फौज सरकारची बाजू न्यायालयात मांडेल. सर्वोच्च न्यायालयाने ज्या ज्या त्रुटी मांडल्या होत्या, त्या दूर कऱण्याचे काम वकिलांची फौज करेल. यातून मराठा समाजाला न्याय मिळेल. तोपर्यंत सर्वांनी संयम राखणं महत्वाचे आहे."
याचबरोबर, "राज्यात कायदा सुव्यवस्थता, शांतता राहिली पाहिजे. सर्व जाती धर्मांना माझं आवाहन आहे की, सर्वांनी संयम राखावा, मराठा समाजाला नक्की न्याय मिळेल. क्युरेटिव्ह पीटिशन ऐकली जाणं ही जमेची बाब आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सर्वांची इच्छा आहे, सत्ताधारी, विरोधक, आंदोलक सर्वांना वाटतं मराठा आरक्षण मिळावं ही सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे कुणीही घाईगडबडीने निर्णय घेऊ नये. संयम बाळगावा," असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यासह मराठा समाजाला केले आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?आरक्षणासाठी सरकारने सुरूवातीला तीन महिने, ४० दिवस नंतर आता २४ डिसेंबरपर्यंत वेळ मागितला. परंतू काहीच निर्णय घेतला नाही. मग आम्ही कुठपर्यंत थांबणार? आम्हालाही मर्यादा आहेत. परंतू आता सहनशिलता संपली आहे. त्यामुळे तयारीला लागा. २० जानेवारीपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहे. मला भेटायला राज्यातील तीन कोटी मराठे येणार आहेत, त्यांना अडवून दाखवा? असे म्हणत सरकाला इशारा दिला आहे. तसेच जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत माघारी येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.