Manoj Jarange Patil Warns Amit Shah News: सगेसोयरेंची अंमलबजावणी, कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीतून मराठा आरक्षण मिळण्यासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सुरू केलेले उपोषण स्थगित केले. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातच आता पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाचे ज्येष्ठ मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान दिले असून, थेट इशारा दिला आहे.
मराठ्यांचे आंदोलन आमच्या पद्धतीने हाताळू, अशा आशयाचे विधान अमित शाह यांनी केली होते. या विधानाचा समाचार घेताना मनोज जरांगे यांनी अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता अमित शाह यांच्याकडे मनोज जरांगे यांनी टीकेचा मोर्चा वळवल्याची चर्चा सुरू झाली आहे. पटेलांचा वापर करून तुम्ही कोणत्या बेटावर काय केले हे आम्हाला माहिती आहे. सिल्वासाच्या बेटावर काय केले? दमणमध्ये काय केले? अंदमानमध्ये काय केले? स्वत:च्या लोकांना खड्ड्यात घालून काय केले, हे आम्हाला माहिती आहे. माझ्या मराठ्यांचे आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत पडू नका. नाही तर तुमचा राजकीय एन्काउंटर करू, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
मोहन भागवत खंबीर आहेत म्हणून, अन्यथा...
तुम्ही बरेच राजकीय एन्काउंटर केले. प्रमोद महाजनांनी काय कमी केले? अडवाणी कुठे कमी पडले? मुरली मनोहर जोशी कुठे कमी पडले? अशोक सिंघल, प्रवीण तोगडिया हे कुठे कमी पडले? सुषमा स्वराज कुठे कमी पडल्या? तुम्ही या लोकांना का मागे पाडले? तुम्ही गोवा, कर्नाटक, हरयाणा आणि तामिळनाडूत तेच केले. तुम्ही वातावरण ढवळून काढण्यापर्यंत काम केले. तोगडियांनी काम नाही का केले? अशोक सिंघलांनी काम नाही का केले? त्यांच्यावर पळून जाण्याची वेळ का आणली? त्यांच्यावर वाईट परिस्थिती आणली. ही तुमची काम करण्याची पद्धत आहे. तुम्ही पक्ष आणि आंदोलन कसे हाताळतात हे सर्वांना माहिती आहे. मोहन भागवत खंबीर आहेत म्हणून. तुम्ही कुणालाही सोडले नाही, या शब्दांत मनोज जरांगे अमित शाह आणि भाजपावर हल्लाबोल केला.
आंदोलन हाताळण्याची नाही, दादागिरीची पद्धत आहे
आंदोलन हाताळण्याची ही पद्धत नाही. ही दादागिरीची पद्धत आहे. सर्व नाराज आहेत. या देशातील व्यावसायिकही तुमच्यावर नाराज आहेत. तुमचे गुजरातचेच व्यापारी परदेशात चालले आहेत. मराठ्यांचे आंदोलन हाताळणे एवढं सोपं नाही. अमित शाह हे शिर्डीला आले होते. तेव्हा आरक्षणाबाबत बोललो होतो. नागपूरला आले होते, तेव्हा बोलले नाही. मराठ्यांच्या नादी लागू नका. तुम्हाला सरळ सांगतो. मराठ्यांना आरक्षण दिले तर सत्तेत राहण्यापासून कोणी रोखू शकत नाही. पण दिले नाही तर मग कठीण आहे, अशी बोचरी टीका जरांगे पाटील यांनी केली.
दरम्यान, तुम्ही स्वत:ला महानबुद्धीचे समजता का? सत्तेच्या बळावर काही करता येते. चांगले काम करणाऱ्यांना संपवले. हे विचार जास्त काळ टिकत नाही. एक दिवस जनतेची खदखद बाहेर येते, तेव्हा लोक सत्तेच्या विरोधात जातात. ज्या यंत्रणांचा वापर केला. त्याही बाजूला होतात. तुमच्या गोळ्या आणि रणगाडेही संपतील. जनता तुम्हाला घरात घुसून वठणवीर आणेल. तुम्हाला अशा पद्धतीने आंदोलन हाताळून मस्ती आली आहे. त्याच पद्धतीने आमचे आंदोलन हाताळून आंदोलन संपवणार असाल तर जनता तुम्हाला वठणीवर आणेल. गुर्जर, पटेल यांचे आंदोलन हाताळून कोणता तीर मारला? असा थेट सवाल मनोज जरांगे यांनी केला.