Manoj Jarange Patil: राज्यात एकीकडे अनेक घडामोडी घडत असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. आधी मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवा. नंतरच आचारसंहिता लागू करा, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आरक्षण हा मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आहे, त्यामुळे राज्यकर्ते निवडणूका घेणार नाहीत, असे मला वाटते. आधी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवा आणि त्यानंतरच निवडणुकीची आचारसंहिता लागू करा, असे मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले. समाजमाध्यमांवरून होणाऱ्या टीकेबाबत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारण्यात आला.
विनाकारण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होत आहे
मी पूर्वी या गोष्टी मनावर घ्यायचो. मी ग्रामीण भागातला आहे त्यामुळे मला आधी कळत नव्हते. पण आता काही फरक पडत नाही. काही लोकांना उद्योग नाही. मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यात छगन भुजबळांची माणसेही असू शकतात. या लोकांना कोणीतरी सुपारी दिली असेल. त्यामुळे विनाकारण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होत आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील कुणबी नोंदी ५७ लाखावरून ६२ लाखांवर पोहचल्या आहेत. सगेसोयरऱ्यांना कुणबी नोंदी देण्याचा अध्यादेश सरकारने दिला आहे. येणाऱ्या अधिवेशनात त्याचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी पाठिंबा देण्यासाठीचे निवेदन प्रत्येक आमदाराला निवेदन द्या. सर्वांच्या सहमतीने सगेसोयऱ्यांचा कायदा मंजूर झाला पाहिजे. १० फेब्रुवारीपासून पुन्हा अमरण उपोषणाला बसत असून कायदा मंजूर होईपर्यंत माघार घेणार नाही. समाजासाठी बलीदान द्यावे लागले तरी मागे हटणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.