पुणे : नरेंद्र मोदींचे सरकार गरीब आणि वंचित लोकांच्या मदतीसाठी निर्माण झालेले सरकार आहे. आताच्या सत्तेत गरिबांना लुटून आपण श्रीमंत होणार नाही, अशी भीती राजकीय पक्षाला बसली असल्याने राजकारणात अनेक वर्षे टिकून राहिलेल्या पक्षातील लोक मोदी सरकारच्या काळात घाबरून राजीनामे देत आहेत. त्यामुळे हा राजकीय पक्ष आपली पिढी चालविण्यास असमर्थ ठरला आहे, असे मत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी व्यक्त केले. विश्व संवाद केंद्र पश्चिम महाराष्ट्र पुणे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने देवर्षी नारद पत्रकारितागौरव पुरस्कार समारंभ आयोजिण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. पात्रा यांच्या हस्ते आज का आनंद समूहचे संस्थापक-संपादक श्याम आगरवाल यांना ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार, दिव्य मराठी सोलापूरचे सिद्धाराम पाटील यांना युवा पत्रकार पुरस्कार, बारामतीचे शिवाजी गावडे यांना व्यंगचित्रकार पुरस्कार आणि हिंदुस्थान टाइम्स मराठीचे संपादक विश्वनाथ गरुड यांना सोशल मीडिया पुरस्कार असे चार पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी विश्व संवाद केंद्र पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले, आदी उपस्थित होते. ........ * भारतात काळा पैसा बाहेर पडत आहे. आता गरिबांना न्याय मिळवून दिला जात आहे. भ्रष्टाचारी लोकांना भारतात जगणे अवघड झाले आहे. आताच्या सत्तेतून त्यांनी कसलीही अपेक्षा करू नये. आपल्या देशाची संस्कृती पाश्चात्त्य संस्कृतीपेक्षा वेगळी आहे. तरीही देशाच्या इतिहासात पाश्चात्त्य संस्कृतीला स्थान दिले जाते, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. इंग्रज दीडशे वर्षे राज्य करून गेले. पण त्यांचे व्यवस्थापन टिकून राहिले आहे. * भारतवर्षच्या पूर्वजांमध्ये आर्यभट्ट शंकराचार्य असे तज्ज्ञ होऊन गेले. त्यांचे ज्ञान आणि विचार आपण आत्मसात न करता पाश्चात्त्य लोकांच्या विचारांना प्राधान्य देत आहोत. देवर्षी नारद हे पहिले पत्रकार होते. तिन्ही लोकांत ते संचार करीत असत. आपण मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाईन डे साजरे करतो. त्याप्रमाणे भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी नारद जयंती साजरी केली पाहिजे, असे संबित पात्रा म्हणाले. देवर्षी नारद यांचा आद्य पत्रकार म्हणून उल्लेख केला जातो. ते संदेशवाहक आणि उत्तम संवादपटू होते. लोककल्याण आणि लोकसेवा हा त्यांचा हेतू होता. देवर्षी कर्माला महत्त्व न देता ज्ञानाला महत्त्व देत असत. पत्रकारानेसुद्धा जनतेशी जोडून राहावे. पत्रकारितेचे कार्य हे राष्ट्रहित आणि लोकहिताचे असावे.- मोहन कुलकर्णी
..................
देश समस्यांनी वेढला आहे. प्रत्येक जण आपल्याच कामात व्यस्त आहे. सामान्य माणसावर अन्याय होत असेल, तर पेपर हे माध्यम त्या अन्यायावर आवाज उठवते. पत्रकारितेला सुरुवात केल्यावर एस. एम. जोशी, भाई वैद्य, मोहन धारिया यांची भाषणे ऐकत असे. त्यातूनच मला प्रेरणा मिळत गेली. त्यानंतर १९७१ मध्ये साप्ताहिक सुरू केले. - श्याम आगरवाल