मुंबई - राज्यातील राजकारणात पहाटेचा शपथविधी मोठा गाजला होता. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यानं राज्याच्या राजकारणात भूकंप आला. मात्र ही राष्टपती राजवट उठवण्याची खेळी होती असं विधान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. त्यानंतर पुन्हा राजकीय वर्तुळात पहाटेच्या शपथविधीबाबत तर्क वितर्कांना उधाण आले. त्यात आता संजय राऊत यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत काही गोष्टी आता जाहीर करण्याची वेळ आली नाही असं सांगितल्यानं चर्चांना उधाण आले आहे.
संजय राऊत म्हणाले की, पहाटेच्या शपथविधीला ३ वर्ष होऊन गेली. त्यामुळे Chapter is close. जेव्हा अजित पवार त्यांचे आत्मचरित्र लिहितील त्यात अनेक गोष्टी येतील. तसेच ही वेळ सगळं सांगण्याची नाही. शरद पवारांनी जे सांगितले ते पुरेसे आहे. या घटनेला ३ वर्ष झालीत त्यामुळे पुन्हा तो मुद्दा चर्चेत घेण्याची गरज नाही.
जयंत पाटलांनी केला होता गौप्यस्फोटराजभवनात पहाटे पाच वाजता झालेल्या शपथविधी सोहळ्याची त्या दिवशी महाराष्ट्रात आणि देशात एकच चर्चा झाली. आजही ती घटना अनेकदा लोकांसाठी चर्चेचा विषय राहिला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. जयंत पाटील म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी तीन वर्षांपूर्वी राजभवनात झाला होता. शरद पवारांचाही तो खेळ असू शकतो. त्यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. पहाटेचा शपथविधीची खेळी जाणीवपूर्वक कुणी केली असं म्हणता येणार नाही मात्र त्यामुळे राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट उठवण्यास मदत झाली. त्या घटनेनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणखी मजबूत झाली असा जयंत पाटील यांनी युक्तिवाद केला.
तर जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटाला काही अर्थ नाही. तो गौप्यस्फोट त्यावेळी का केले नाहीत. मूळात उशिरा सूचलेल्या शहाणपणाला काहीच अर्थ नाही. संदर्भ नसलेल्या गोष्टी असतात. कुणी काय म्हणाले याला काही अर्थ नाही असं सांगत भाजपा नेते चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली होती.