पैसे परत दिल्याचा मेपलचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2016 01:35 AM2016-05-19T01:35:22+5:302016-05-19T01:35:22+5:30
मेपल ग्रुपच्या सचिन अगरवाल यांनी उच्च न्यायालयात सर्वांचे पैसे परत केल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
पुणे : महाराष्ट्र हाऊसिंग डेच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अवघ्या पाच लाखांत घर देण्याची जाहिरात करून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर बुकिंग घेतलेल्या मेपल ग्रुपच्या सचिन अगरवाल यांनी उच्च न्यायालयात सर्वांचे पैसे परत केल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्राची पडताळणी करून नेमके किती जणांचे पैसे परत मिळाले आहेत, याचा तपास करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला दिल्याची माहिती उपायुक्त दीपक साकोरे यांनी दिली.
मेपलने ‘महाराष्ट्र हाऊसिंग डे’ निमित्त आपलं घर योजनेमध्ये पाच लाखांत घर देण्याची फसवी जाहिरात केली होती. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सचिन अशोक अगरवाल, नवीन अशोक अगरवाल, विक्री व्यवस्थापक प्रियंका अगरवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कंपनीच्या योजनेसंदर्भातील कागदपत्रे आणि अन्य गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी मेपलच्या जमिनींची माहितीही घेतली होती. एकूण ३२ हजार लोकांपेक्षा अधिक जणांनी बुकिंग केल्याचे तपासात समोर आले होते.
>नोंदणीमधून कंपनीला जवळपास पावणेचार कोटी रुपये मिळाले होते. आॅनलाइन नोंदणी करण्यासाठी वापरण्यात आलेले स्टेट बँक आॅफ इंडियाचे खाते पोलिसांनी गोठवण्यात आले आहे. पोलिसांनी तक्रारदारांचे जबाब नोंदवून घेतले होते. सचिन अगरवाल यांनी शिवाजीनगर न्यायालयाकडे दाखल केलेला अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळला गेल्यानंतर त्यांनी अॅड. अनिकेत निकम यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता.