मराठा समाजातील तरुण वर्गाचा संयम संपतोय; वेळीच निर्णय घ्या – अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 04:18 PM2018-07-19T16:18:56+5:302018-07-19T16:26:43+5:30
मराठा समाजाने शांततेने मूक मोर्चे काढले त्यामुळे त्यांचे जगभर कौतुकही झाले. परंतू आता या समाजातील तरुण वर्गाचा संयम सुटत आला आहे. एकादशीच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो त्यामुळे सरकारने मराठा आरक्षणाबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मराठा आरक्षणावरील स्थगन प्रस्तावावर बोलताना केली.
नागपूर : मराठा समाजाने शांततेने मूक मोर्चे काढले त्यामुळे त्यांचे जगभर कौतुकही झाले. परंतू आता या समाजातील तरुण वर्गाचा संयम सुटत आला आहे. एकादशीच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो त्यामुळे सरकारने मराठा आरक्षणाबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मराठा आरक्षणावरील स्थगन प्रस्तावावर बोलताना केली.
मराठा समाज अनेक दिवसांपासून आरक्षणाची मागणी करत आहे. सरकारने अनेकवेळा त्यांना आश्वासन दिले मात्र त्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. सरकारने मराठा आरक्षणासाठी समिती गठीत करतो, अभ्यास करतो, आरक्षण देतो असे सांगितले. मात्र अजूनही आरक्षण दिले नाही. त्यामुळे इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे अशी जनतेची भावना असल्याचे अजित पवार म्हणाले. कोर्टानेही मराठा आरक्षणाबाबत भूमिका घ्या असे सरकारला सांगितले होते. त्यानंतर सरकारने सहा शासन निर्णय काढले आहेत मात्र त्यावर कोणतीच भूमिका घेतली गेली नाही असा आरोपही अजित पवारांनी केला.
मध्यंतरी या समाजाने तुळजाभवानीच्या मंदिरात गोंधळ ( पुजा ) घालून आरक्षण देण्याची मागणी केली होती आणि आता या समाजाने आषाढी एकादशीला शासकीय पुजेच्या वेळी आरक्षणाची मागणी करणारे आंदोलन करण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्यासाठी स्थगन प्रस्तावावर सभागृहात चर्चा व्हायला हवी अशी मागणीही अजित पवारांनी केली.