मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे - शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2016 01:23 PM2016-08-30T13:23:16+5:302016-08-30T13:49:43+5:30
अॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर दलितांकडून नव्हे, स्थानिक नेतृत्वाकडून होतोय. त्यामुळे अॅट्रोसिटीचा गैरवापर होऊ नये यावर प्रशासनाने लक्ष ठेवले पाहिजे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - अॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर दलितांकडून नव्हे, स्थानिक नेतृत्वाकडून होतोय. त्यामुळे अॅट्रोसिटीचा गैरवापर होऊ नये यावर प्रशासनाने लक्ष ठेवले पाहिजे. तीच आमची भूमिका आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी सांगितले. ते पत्रकारपरिषदेत बोलत होते.
अॅट्रोसिटी कायदा पूर्णपणे रद्द करा अशी आमची भूमिका नाही. अॅट्रोसिटीचा गैरवापर दलितांनी नव्हे राजकारणासाठी स्थानिक पुढा-यांनी केला असे शरद पवार यांनी सांगितले. सध्या मराठा समाजाचे जे मोर्चे निघत आहेत ते योग्य आहेत, सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे असे पवारांनी सांगितले.
ओबीसी आरक्षणला धक्का न लावता आर्थिक दृष्टया मागास मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे शरद पवार यांनी सांगितले. मराठवाडयात इसिसशी संबंध असल्याच्या संशयातून सरसकट मुस्लिम तरुणांची धरपकड करणे चुकीचे असल्याचे शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रातील मुस्लिम संघटनांनी आधीच इसिसचा निषेध केला आहे असे शरद पवार यांनी सांगितले.