औरंगाबाद/बुलडाणा : मराठा आरक्षणासाठी आणखी चार तरुणांनी आत्महत्या केली आहे. मराठवाड्यात दोघांनी तर बुलडाणा जिल्ह्यात दोन जणांनी आपले जीवन संपविले. मराठवाड्यात आतापर्यंत पाच जणांनी मृत्यूला कवटाळले आहे. आरक्षणासाठी राज्यात रास्ता रोको, ठिय्या आंदोलन सुरूच आहे.मराठा आरक्षण, कुटुंबाचा औषधाचा वाढता खर्च व कर्जामुळे बीड जिल्ह्याच्या विडा गावातील उच्चशिक्षित अभिजीत बालासाहेब देशमुख (३५) या अविवाहित तरुणाने झाडाला गळफास घेतला. मृत्यूपूर्वी त्याने चिठ्ठी लिहिली होती. आरक्षणाअभावी नोकरी मिळत नसल्याची भावना एमएस्सी (केमिस्ट्री) उत्तीर्ण झालेल्या अभिजीतची होती. चिठ्ठी अभिजीतनेच लिहिली आहे का, याची पडताळणी सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी सांगितले.अभिजीतच्या कुटुंबीयांना सरकारकडून १0 लाख रुपयांची मदत व पात्रतेनुसार कुटुंबातील एका सदस्याला प्राधान्याने नोकरी दिली जाईल, असे उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सांगितले.आरक्षण नसल्याने आयटीआयला प्रवेश मिळाला नसल्याने वडोदबाजार (जि. औरंगाबाद) येथे प्रदीप हरिदास म्हस्के (१६) याने विहिरीत उडी घेऊन जीवन संपविले. प्रदीपला दहावीत ७५ टक्के गुण मिळाले होते. आयटीआयसाठी सोमवारी झालेल्या तिसऱ्या फेरीतही त्याचा नंबर न लागल्याने तो निराश झाला होता. त्यातच स्थानिक महाविद्यालयाने त्याला ११ वीच्या विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी केली होती. घरची परिस्थिती बेताची असल्याने तो एवढी मोठी रक्कम देऊ शकत नव्हता, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. बुलडाण्यातील उबाळखेड येथील नंदू बोरसे (४७) यांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडे चिठ्ठी सापडली आहे. जिल्ह्यात दुसºया घटनेत खंडाळा देवी येथील संतोष आत्माराम मानघाले (३२) याने सोमवारी रात्री गोठ्यामध्ये आत्महत्या केली.मुस्लीम, धनगर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावरआरक्षणासाठी ३ आॅगस्टपासून मुस्लीम बांधव रस्त्यावर उतरणार आहेत. ‘धनगड’चे धनगरकरण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा धनगर समाजाने मंगळवारी दिला.बाहेरच्यांमुळे हिंसाचारचाकणमध्ये बाहेरच्या लोकांनी हिंसाचार केल्याचे सांगून पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले की, दोन ते तीन हजारांचा जमाव बाहेरून आला होता.लातूर : आठ युवकांचा आत्मदहनाचा प्रयत्नऔसा (जि़ लातूर) तहसील कार्यालयात आठ युवकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेतले़
Maratha Reservation: आरक्षणासाठी ४ आत्महत्या; मराठा आंदोलनाची धग कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2018 6:18 AM