पुणे – प्रकाश शेंडगे असे बोलतील वाटलं नव्हते. त्यांचा विचार असा नाही. भुजबळांना पाडायचे आमच्या डोक्यात नाही. भुजबळांच्या विचाराला आमचा कडाडून विरोध आहे. व्यक्ती म्हणून आमचं म्हणणं नाही. मराठ्यांच्या लेकरांचे कल्याण व्हावं अशी भूमिका त्यांनी घ्यावी. आमचा मराठ्यांचा अजेंडा एकच आहे, कुणीही आडवे आले तरी आरक्षण मिळवणार आहेत. मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात बोलला तर ते सहन होणार नाही. राजकीय आरोप कितीही केले तरी मी माझ्या समाजाच्या लेकरांची बाजी लावतोय असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सध्या समाजाचा आशीर्वाद घेत चाललोय, १० लोकं असले तरी थांबतो, पुढे ५० हजार असले तरी थांबतो. वरवंडे गावात प्रचंड लोक होते, लोकांची भूमिका योग्य आहे. मराठ्यांच्या पोरांना १०० टक्के आरक्षण मिळणार आहे. मराठ्यांना पूर्ण खात्री आहे. माझा समाज गोरगरिबांच्या लेकरांसाठी लढतोय. आम्ही कुणाच्या विरोधात बोलत नाही. परंतु आमच्या आरक्षणाविरोधात बोलला तर सोडणार नाही असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत प्रत्येकाला सभा घेण्याचा अधिकार आहे, आम्हाला त्याचे दु:ख नाही. आम्ही आमचे आरक्षण घेतोय, जो तो त्यांच्या हक्कांसाठी लढतोय. मला नेत्यांना सांगणे आहे की, आमच्या लेकरांचेही कल्याण करा. नुकसान करू नका. आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला द्या, आरक्षण देऊच नका असं बोलतायेत, आम्ही एवढे काय पाप केलंय तुम्ही आम्हाला नोकरी, शिक्षणातही आरक्षण देत नाही असा सवाल मनोज जरांगे यांनी ओबीसी नेत्यांना विचारला आहे.
...तर आम्ही १६० आमदार पाडू – प्रकाश शेंडगे
छगन भुजबळ यांनी ज्यावेळी ओबीसींच्या बाजूने आवाज उठवला तेव्हापासून प्रस्थापित मराठा समाजाने खालच्या पातळीवर त्यांच्यावर टीका केली. इतकेच नाही तर एकही मराठा त्यांना मतदान देणार नाही अशी भाषा करू लागला. यापूर्वी असे कधी नव्हते. भुजबळांच्या मतदारसंघात केवळ मराठा नाही, तर दलित, धनगर, मुस्लीम इतर सर्व जातीची माणसे आहेत. मराठा नाही केले तरी बाकीचे मतदान करणार आहे. जर भुजबळांना पाडण्याची होत असेल तर राज्यात ओबीसी समाजही ६० टक्के आह. प्रत्येक मतदारसंघात ओबीसी समाज आहे. जर तुम्ही एक भुजबळ पाडणार असाल तर ओबीसी तुमचे १६० आमदार पाडल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा प्रकाश शेडगेंनी दिला.