"तुमच्याकडं हुशारी हाय ना, मग..."; टीका करणाऱ्यांवर मनोज जरांगे पाटील संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 01:25 PM2024-01-29T13:25:18+5:302024-01-29T13:25:44+5:30

तुमचे ज्ञान तिकडे वापरा. सगेसोयरा हा शब्द पक्का आहे. समाजाच्या बाजूने तुम्ही लिहा असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. 

Maratha Reservation: Manoj Jarange Patil criticizes people who criticize his | "तुमच्याकडं हुशारी हाय ना, मग..."; टीका करणाऱ्यांवर मनोज जरांगे पाटील संतापले

"तुमच्याकडं हुशारी हाय ना, मग..."; टीका करणाऱ्यांवर मनोज जरांगे पाटील संतापले

रायगड - गोरगरीब मराठ्यांसाठी ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी हा कायदा खूप महत्त्वाचा आहे. परंतु जे अभ्यासक, वकील, घटनातज्ज्ञ, कायदेशीर अभ्यास असणाऱ्यांनी आता ताकदीनं तुमचं म्हणणं मांडा. सगेसोयरे हा शब्द आता फिक्स झालाय. ते फायनल आहे. आता हा कायदा मजबूत कसा करता येईल ते मांडा. सोशल मीडियावर चर्चा करून कशाला दुही दाखवता? गैरसमज पसरवता..तुमच्याकडे हुशारी आहे ना, ती समाजाने मान्य केली. मग समाजासाठी तुमची हुशारी दाखवा. सोशल मीडियावर लिहायला लागले. आम्हाला काही कळत नाही वाटतं का तुम्हाला अशा शब्दात टीका करणाऱ्यांवर मनोज जरांगे पाटील संतापले. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, १५ दिवसांच्या हरकती मागितल्या आहेत. त्यात आपले म्हणणं मांडा. त्यामुळे ताकदीने लढता येईल. मी एकाकी लढण्यापेक्षा तुम्हीही पाठिंबा द्या ना..सोशल मीडियावर कशाला लिहिता?, लाख कोटी मराठे गेले, तुम्ही आम्हाला येडं समजता का? मराठवाड्यातील मराठ्यांना विनंती आहे की सगेसोयरे या शब्दामुळे एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही हा माझा शब्द आहे. १९८४ च्या गॅझेटनुसार मराठवाड्यातील सगळा मराठा हा कुणबी आहे. तुम्ही धीर धरा. मराठवाड्यातील मराठ्यांनी टेन्शन घेऊ नका. फक्त एकजूट राहा. मराठवाड्यातील मराठा हा कुणबीत जाणार आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच या कायद्यामुळे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनी तातडीने नातेवाईकांनाही अर्ज करायला सांगा. पटापट कुणबी प्रमाणपत्रे काढून घ्या. जितका विरोध होईल तितका हा कायदा मजबूत आहे समजून घ्या. नोंद नसलेल्या मराठ्यांसाठी हा कायदा आहे. ज्याची नोंद मिळाली तो तुमचा सोयरा आहे का हे बघा, लगेच नोंद करून घ्या. २-४ लोक काय बोलले म्हणून कोट्यवधी मराठे बोलतायेत असं नाही. हा कायदा पक्का आहे. सोशल मीडिया, मोबाईलवर लिहेपर्यंत हरकतीवर म्हणणं मांडा. तुमचे ज्ञान तिकडे वापरा. सगेसोयरा हा शब्द पक्का आहे. समाजाच्या बाजूने तुम्ही लिहा असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. 

रायगडला शिवरायांच्या दर्शनासाठी जाणार 
विश्वाची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी आपण जाणार आहोत. २९ जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून निघणार असून, ३० जानेवारी रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहोत. ३१ जानेवारी रोजी आपण घरी जाणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले.

Web Title: Maratha Reservation: Manoj Jarange Patil criticizes people who criticize his

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.