गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. त्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्यावं, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं आहे. तसेच त्याला प्रचंड प्रतिसादही मिळत आहे. मात्र मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांच्यासह अनेकओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी आरक्षणाबाबतची आंदोलनं आणि मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, मला असं वाटतं की मनोज जरांगे हे आरक्षणासाठी लढताहेत, असं आम्हाला सुरुवातीला निश्चित वाटत होतं. परंतु मागच्या आठ-पंधरा दिवसांतल्या त्यांच्या भूमिका आहेत त्या पाहिल्या तर कुठेतरी त्यांचा आरक्षणावरचा फोकस हललेला दिसत आहे. आरक्षणावरचा फोकस हलून व्यक्तिगत टीकाटिप्पणी करणे हे शोभत नाही. एकीकडे आपण मागास म्हणता, दुसरीकडे जरांगे आडनावाला जोडून पुढे पाटील लावायचा प्रयत्न करता. एकीकडे तुम्ही आर्थिक मागाससलेले म्हणता दुसरीकडे शंभर शंभर जेसीबीतून फुलांची उधळण करून देता. एकीकडे आमच्याकडे काहीच नाही म्हणता, दुसरीकडे तुमच्या सभेसाठी दीडशे एकर मोसंबीची बाग तोडली जाते. एकीकडे तुम्ही म्हणता आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त आरक्षण हवं आहे. मग दुसरीकडे त्याची काय लायकी माझ्या हाताखाली काम करण्याची असंही म्हणता, ही विधानं चुकीची आहेत, असं स्पष्ट मत सुषमा अंधारे यांनी मांडला.
त्या पुढे म्हणाल्या की, मराठ्यांना आरक्षण मिळावं का, तर नक्की मिळालं पाहिजे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागावा का? तर तो लागू नये. कारण तेही गरजेचं आहे. या दोन्हीतून मार्ग काढण्याची कुवत निव्वळ आणि निव्वळ केंद्र सरकारमध्ये आहे. कारण आरक्षणाचा प्रश्न हा मुलभूत हक्कातील कलम १६ शी संबंधित आहे. तसेच मुलभूत हक्कांमध्ये जर घटनादुरुस्ती करायची असेल तर तो अधिकार कलम ३६८ क नुसार केंद्र सरकारला आहे. म्हणजेच भाजपचा आहे. त्यामुळे यात सरळ साधी गोष्ट आहे. मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे बसावं आणि विधिमंडळाचा एक ठराव पास करून घ्यावा. तो केंद्राकडे पाठवावं. त्यानंतर केंद्रानं विशेष अधिवेशन बोलावून हा प्रश्न निकाली काढावा, असा सल्ला सुषमा अंधारे यांनी दिला.
मात्र केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेला भाजपा या प्रश्नावरून जाणीवपूर्वक दाणे टाकून कोंबडी झुंजवतात, तसे झुंजवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण भाजपाला हे माहिती आहे की, महाराष्ट्रातील महिला सुरक्षा, आरोग्याची दुरवस्था, कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा, कंत्राटी भरती, बेरोजगारी, दुष्काळी परिस्थिती या सगळ्या प्रश्नांवर भाजपा सपशेल अपयशी ठरला आहे. या अपयशी भाजपाने हे सगळे मुद्दे वळवून आरक्षण हा एकच मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आणला आहे. पण त्यांना आरक्षण द्यायचं नाही आहे. तर या निमित्ताने त्यांना वेगवेगळ्या जातींमध्ये झुंजी लावायच्या आहेत, असा सनसनाटी आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
जरांगे एकीकडे भुजबळ यांची काय लायकी आहे. त्याची काय लायकी आहे. ते मराठ्यांच्या हाताखाली काम करत होते, अशी विधानं करतात. याचा अर्थ या विधानांमधून जरांगे हे त्यांचीच विधानं खोडून काढत आहेत. आम्हाला काम मिळत नाही, असं ते म्हणतात आणि आमच्या हाताखाली काम करतात, असंही ते म्हणतात, ही दोन्ही विधानं परस्परविरोधी आहेत. मला वाटतं जरांगे यांनीही यासंदर्भात तारतम्या बाळगलं पाहिजे, असा सल्लाही सुषमा अंधारे यांनी दिला.
त्या शेवटी म्हणाल्या की, दोनही समुहांनी आरक्षण मिळवणं हा जर आपला प्रधान हेतू असेल तर तो फोकस हलू न देता व्यक्तिगट टीकाटिप्पणी, चिखलफेक टाळावी आणि महाराष्ट्राच्या गावगाड्याची वीण उसवू नये, असे आवाहनही सुषमा अंधारे यांनी केलं.