मुंबई - महाड शहरातील काजळपुरा भागातील तारिक गार्डन ही इमारत सोमवारी सायंकाळी कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. इमारत कोसळत असतानाच काही जण सुखरूप बाहेर पडले. मात्र, अनेक जण मातीखाली अडकले गेले. इमारत दुर्घटनेमधील मृतांची संख्या आता 14 झाली आहे. ही पाच मजली इमारत सोमवारी कोसळली होती. महाड दुर्घटनेवर अभिनेता सुबोध भावे याने ट्विट केलं आहे.
'इमारत असो वा समाज, पाया हा मजबूतच हवाच' असं सूचक ट्विट करून सुबोधने महाड दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्याने याबाबतचे ट्विट केले आहे. "महाडमध्ये जे घडलं ते अत्यंत दुर्देवी आहे. जखमी आहेत ते लवकर बरे होवोत आणि मृतांच्या कुटुंबीयांना या दु:खातून बाहेर पडण्याची ताकद ईश्वर देवो, इमारत असो वा समाज, पाया हा मजबूतच हवाच", असं सुबोधने ट्विटमध्ये म्हटलं आहे. याआधीही सुबोधने वेळोवेळी सामाजिक मुद्द्यांवर आपलं मत मांडलं आहे.
तारिक गार्डन ही पाचमजली इमारत सोमवारी सायंकाळी कोसळली आणि मोठी दुर्घटना घडली. क्षणात अनेकांचे संसार मातीमोल झाले. इमारत कोसळण्याच्या स्थितीत असतानाच काही जण बाहेर पडले. या ठिकाणी राहत असलेले बशीर चिचकर यातून सुखरूप बाहेर पडले. इमारत भूकंप आल्यानंतर ज्याप्रमाणे हलते तशी हलू लागली आणि आम्ही बाहेर पडू लागलो, असे चिचकर यांनी सांगितले. या दुर्घटनेत इमारतीमधील 80 जण बचावले असून 14 मृतदेह काढण्यात आले आहेत. मदत कार्याला वेग आला असून, इमारतीचा पडलेला भराव काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आपले नातेवाईक सुखरूप असावी आशा आशेने त्यांचे नातेवाइक घटनास्थळीच बसले आहेत. एनडीआरएफ टीम, पोलीस, प्रशासनाला परिसरातील नागरिक मदत करत आहेत.
मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत
महाड इमारत दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या नातेवाइकांना राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून प्रत्येकी चार लाख रुपये तर मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपये असा एकूण पाच लाख रुपयांचा मदतनिधी दिला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केले. त्याचप्रमाणे जखमी झालेल्या रहिवाशांना तातडीची मदत म्हणून 25 हजार रुपये आणि संपूर्ण उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
चौकशी समिती नेमली
इमारत दुर्घटनेच्या चौकशीसाठी कोकण विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिकेचे अधिकारी यांची एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
"गद्दार भाजपाच्या चीन प्रेमाचा धिक्कार, बंदी घातलेल्या चीनी अॅपचा करताहेत वापर"
CoronaVirus News : काँग्रेसच्या संकटमोचकावरच कोरोनाचे संकट; डी. के. शिवकुमार पॉझिटिव्ह
सायकल घेणं शक्य नव्हतं म्हणून बाप-लेकानं केला भन्नाट 'जुगाड'; Video तुफान व्हायरल
थरुरांच्या घरातच झाली होती सर्व तयारी; काँग्रेसमध्ये खळबळ माजवणाऱ्या 'त्या' पत्राची इनसाईड स्टोरी