मुंबई – दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी अभिनेत्री प्रिया बेर्डे लवकरच राजकारणाच्या मैदानात उतरणार आहे. येत्या ७ जुलै रोजी प्रिया बेर्डे खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. पुण्यात निसर्ग येथील पक्षाच्या कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडेल.
प्रिया बेर्डे यांच्यासोबत अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके, विनोद खेडकर, लावणीसम्राज्ञी शंकुतलाबाई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, निर्माते संतोष साखरे, सुधीर निकम हेदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी चित्रपत आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबा पाटील यांनी दिली आहे. सिनेसृष्टीतील पडद्यामागील कलाकार, तंत्रज्ञ आणि बॅकस्टेज कर्मचारी यांच्यासाठी मला काम करण्याची इच्छा आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभाग उपयुक्त ठरु शकतो, चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवू शकते असा विश्वास प्रिया बेर्डे यांनी व्यक्त केला.
त्याचसोबत पुणे शहर माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. कारण याच ठिकाणी माझ्या मुलांचे शिक्षण झाले आहे. लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचं कामही पुण्यातून सुरु झाले. त्यामुळे पुण्यातून माझ्या नव्या कारकिर्दीला सुरुवात करण्याची इच्छा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे मार्गदर्शन मिळू शकेल, यासाठी मी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे असं प्रिया बेर्डे यांनी सांगितले.
प्रिया बेर्डे यांनी मराठीतल्या अनेक प्रसिद्ध चित्रपटात काम केले आहे. बजरंगाची कमाल, धमाल जोडी, जत्रा, तु.का पाटील, रंपाट, रंगत संगत, अशी ही बनवा बनवी यासारख्या त्यांनी भूमिका साकारली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे यांनी प्रवेश केला होता. त्यांना शिरुर लोकसभेचं तिकीट पक्षाकडून देण्यात आलं, याठिकाणी डॉ. अमोल कोल्हे भरघोस मतांनी निवडून आले आहेत, त्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त १२ जागांमध्ये ज्यात साहित्यिक, कलाकार, क्रीडा अशा क्षेत्रातील दिग्गजांना संधी देण्यात येते. या निमित्ताने प्रिया बेर्डे यांना ही संधी मिळू शकते का? अशी चर्चा सध्या सुरु आहे.