- रवींद्र मांजरेकर मुंबई : शुद्धलेखनाच्या १८ नियमांनी अवघडलेल्या मराठी भाषेला मोकळी करण्याचा प्रयत्न १२ वर्षे सुरू आहे. त्या नियमांबाबत चर्चेअंती तयार झालेले दोन अहवाल मराठी भाषकांच्या मतदानासासाठी देण्याची सवड चार वर्षांत मराठी साहित्य महामंडळाला झाली नाही. आता मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने अहवालांवरील धूळ झटकली जाईल का, असा अभ्यासकांचा प्रश्न आहे.महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कारित केलेल्या मराठी लेखनविषयक १४ नियमांना १९६२ मध्ये मान्यता देण्यात आली. पुढे १९७२ मध्ये महामंडळाने आणखी चार नियमांची भर घातली. या नियमांवर संस्कृतचा प्रभाव आहे. मराठीत आलेल्या संस्कृत शब्दांना संस्कृतचेच नियम लावण्यात येतात. त्यामुळे मराठी शुद्धलेखनाचे नियम अवघड झाले आहेत. संस्कृतचे शब्द ओळखता येत नाहीत, ही अडचण भाषेच्या अभ्यासकांच्या लक्षात आली. त्यातून मार्ग काढण्यासाठी २००८ पासून प्रयत्न सुरू आहेत.त्याचाच एक भाग म्हणून २००८ ते २०१० या काळात महामंडळातर्फे मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपुरात चर्चासत्रे झाली. अभ्यासकांची मते घेतली. त्यावर विचार करण्यासाठी २०१४ मध्ये सात जणांची समिती नेमण्यात आली. डिसेंबर-२०१४ ते मार्च-२०१५ या काळात या समितीच्या सभा झाल्या.या समितीमध्ये मराठीप्रेमी आणि संस्कृतप्रेमी असे दोन गट पडले. संस्कृतसह कोणत्याही परभाषेतून आलेले शब्द हे मराठीच्या नियमाप्रमाणे चालतील, असा मुख्य बदल शुद्धलेखनाच्या नियमांत करावा. त्यामुळे मराठीचा वापर सोपा होईल आणि क्लिष्टता निघून जाईल, असा एक मतप्रवाह आहे. संस्कृतचे वेगळेपण सोडणे म्हणजे भाषेपासून दूर जाणे, असा दुसरा मतप्रवाह आहे. या मतप्रवाहांत एकवाक्यता न झाल्याने शुद्धलेखनाच्या सोप्या नियमांविषयी काहीच निर्णय झाला नाही, असे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी स्पष्ट केले.शेवटच्या दिवशी प्रस्ताव देण्यासाठी अगदीच थोडा वेळ शिल्लक राहिल्याने प्रस्ताव नीट मांडता आलेले नाहीत. त्यामुळे आमच्याकडून सविस्तर प्रस्ताव मागवावेत आणि ते मराठी जनतेसमोर जावेत, अशी मागणी समितीचे एक सदस्य अरुण फडके यांनी केली आहे.संकेतस्थळावर टाका दोन्ही प्रस्तावतोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंचे प्रस्ताव मराठी जनांच्या अभ्यासासाठी महामंडळाने त्यांच्या संकेतस्थळावर प्रकाशित करावेत, असे ठरले होते. त्यालाही आता चार वर्षे उलटून गेली, तरीही या प्रस्तावावरील धूळ झटकण्यास महामंडळ तयार नाही. मराठीच्या अभ्यासकांनी शुद्धलेखनाचा विचार करावा, असे आपले मत असल्याचे ठाले-पाटील म्हणाले.
मराठी भाषा दिन: सोप्या मराठीच्या वाटेत महामंडळाची आडकाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 5:06 AM