राज्यातील फुलपाखरांना मिळाली मराठी नावे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 07:49 PM2019-06-06T19:49:30+5:302019-06-06T19:54:01+5:30
समितीने प्रथम महाराष्ट्रात आढळणाऱ्या प्रजातींच्या यादीस अंतिम स्वरूप देऊन नावे देण्यासाठी निकष ठरविण्यात आले होते.
मुंबई : महाराष्ट्रात सापडणाऱ्या सर्वच फुलपाखरांना मराठमोळ्या भाषेतील नावे असावीत म्हणजे ते लक्षात राहण्यास सोपी होतील व त्यातून अनेक फुलपाखरांची सर्वसामान्यना ओळख सुद्धा होईल व ती नावे सर्वमान्य झाल्यास पक्ष्यांप्रमाणे फुलपाखरे सुद्धा सर्वांच्या परिचयाची वाटू लागतील. यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाकडून एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीमध्ये महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष तथा फुलपाखरू अभ्यासक डॉ. विलास बर्डेकर, मंडळाचे सदस्य डॉ. जयंत वडतकर, फुलपाखरू अभ्यासक तथा बी.एन.एच.एस, चे डॉ. राजू कसंबे, फुलपाखरू अभ्यासक श्री. हेमंत ओगले, श्री. दिवाकर ठोंबरे तथा निमंत्रित सदस्य श्री. अभय उजागरे यांचा समावेश होता.
समितीने प्रथम महाराष्ट्रात आढळणाऱ्या प्रजातींच्या यादीस अंतिम स्वरूप देऊन नावे देण्यासाठी निकष ठरविण्यात आले होते. पुढील बैठकीत राज्यात आढळणाऱ्या एकूण २७७ फुलपाखरू प्रजातीस मराठी नावे ठरविलीत, त्यानंतर सदर यादी अभ्यासकांना, सबंधित संस्थांना पाठवून तसेच समाज माध्यम, वेबसाईट, वृत्तपत्र याव्दारे सर्वांसाठी उपलब्ध करून देऊन त्यावर ११ मे पर्यंत सूचना, नावे सुचविण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले. त्यानुसार राज्यातून भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था (ZSI) वन विभाग, फुलपाखरू तज्ञ श्री आयझँक केहीमकर, कु. गार्गी गिद, प्रा. अमोल पटवर्धन, प्रा. सुधाकर कुऱ्हाडे, श्री. अभय उजागरे, अशा एकूण २५ संस्था, व्यक्ती, अभ्यासक तथा फुलपाखरू प्रेमीं जणांकडून सुमारे ३७७ नावे तसेच फुलपाखरांच्या कुळांची नावे आणि काही मौलिक सूचना प्राप्त झाल्या आहेत.
प्राप्त नावांचा आणि सूचनांचा विचार करून तसेच निकषांचा विचार करून या मराठी नावांच्या यादीस अंतिम स्वरूप देण्यात आले. यासाठी या समितीची अंतिम बैठक नुकतीच (दि. ०४ जुलै) पुणे येथे पार पडली असून त्यामध्ये ठरविण्यात आलेल्या नावांस मान्यतेसाठी शिफारस राज्य जैवविविधता मंडळाकडे करण्यात आली असून मंडळाच्या बैठकीत या यादीस मान्यता मिळू शकेल अशी माहिती मंडळाचे सदस्य तथा समिती सदस्य डॉ. जयंत वडतकर यांनी दिली.
फुलपाखरांची मराठी नावे ही त्यांचे रंग, रूप, आकार, सवय, दिनक्रम, आवडीनिवडी, दिनक्रम, खाद्य वनस्पती, तसेच आवश्यक तेथे इंग्रजी नावांचे भाषांतर, संस्कृत भाषा व पौराणिक ऐतिहासिक संदर्भ, ई निकषांचा विचार करून नावावरून फुलपाखरू ओळखता यावे तसेच उच्चारण्यास सोपे, सहज तोंडी बसेल, व काही ठिकाणी बोलीभाषेतील शब्दांचा वापर करून ही नावे ठरविण्यात आली आहेत. यापूर्वी डॉ. संजीव नलावडे, डॉ. राजू कसंबे यांचे पुस्तकात आलेली आणि काही प्रचलित असलेल्या नावांचा सुद्धा यावेळी विचार करण्यात आला. यादीस मंडळाच्या पुढील बैठकीत मान्यता प्राप्त झाल्यानंतर या नावाच्या प्रचार व प्रसार करून सर्वमान्य होण्यासाठी प्रयत्न सुद्धा करण्यात येतील अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर यांनी दिली.
दिलेल्या नावांमध्ये नीलायम, निलपर्ण, भोंडी, नीलरेखा, भीमपंखी, बहुरूपी, सोंगाड्या, भटक्या, गोलू, मदालसा, पट्टमयूर, ढवळ्या, पवळ्या, भिरभिरी, हबशी, केशरटोक्या, शेंदूरटोक्या, नीलाम्रुद, नीलबाभळी, अशोकासक्त, रत्नमाला, झिंगोरी, तरूछाया, तरंग, झुडपी हुप्या, ताडपिंगा, रुईकर अशा नावांचा समावेश आहे. फुलपाखरांच्या सहा कुळांना सुद्धा नावे देण्यात आलीत.