- दीपक करंजीकर(अभिनेता व अर्थतज्ज्ञ) उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर, यंत्रभूमी, मंत्रभूमी, तंत्रभूमी अशी वर्षानुवर्ष ओळख असलेल्या नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. कुसुमाग्रज नगरी असे संमेलन स्थळाला नाव देण्यात आले आहे. संमेलन ज्या टाईमलाईनवर होत आहे तो फार महत्त्वाचा आहे. जगण्याचे सर्व आयाम जेथे उपभोगता येतात अशी शहरे देशात बोटावर मोजण्याइतकीच आहे. आणि त्यात नाशिकचा समावेश होतो. अशा शहरात मराठी साहित्य संमेलन होत आहे. यानिमित्ताने साहित्य संमेलनाने ९४ व्या वर्षी आपली कूस बदलण्याची गरज आहे. नवीन शतकातील २० वर्ष उलटून गेली आहेत. या वर्षात तंत्रज्ञानाचा जो वेग बघितला तर, तो त्याआधीच्या पन्नास वर्षाच्या तुलनेत अधिक आहे. इतके झपाट्याने सर्व बदलत आहे. साहित्य हे समाज मनाचे प्रतिबिंब असते. खरं तर, तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. अशा परिस्थितीत वैज्ञानिक या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभतो, ही फार मोठी गोष्ट आहे. कूस बदलायची म्हणजे काय करायचे. तर, त्याला अनेक आयाम आहे. विज्ञानाने आत्तापर्यंत आपल्यासाठी काय केले. तर, आपली जीवनशैली, विचार पद्धती, संवाद पद्धती बदलली. काही भागात आपलं अवलंबित्व वाढवलं तर, काही भागात कमी केले. विज्ञानाने आपल्याला जिज्ञासू वृत्ती दिली. या जगातील प्रत्येक गोष्ट शास्त्र काट्याच्या कसोटीवर ताणून पाहायची असते आणि ती वारंवार घडत असेल तर, ते वैज्ञानिक सत्य मानायचे असते, असा दृष्टिकोन विज्ञानाने दिला. नाशिकमधील साहित्यिकांनी अध्यक्ष जयंत नारळीकर यांच्यासोबत बैठक घेऊन काही लोकांना विज्ञान कथेचा वारसा कसा सोपवता येईल यावर विचार करायला हवा. विज्ञानातील काही शोध हे एखाद्या कल्पितापेक्षाही अद्भूत असू शकतात. याची ओळख करून देणारे अनेक लेखक मराठीत आहेत. पण कुतूहलाचे विषय वेगळे असतील अशा तरुणांनी त्यांच्यापेक्षा तरुण असलेल्या पिढीकरिता विज्ञानाची महती पोहोचवणाऱ्या कथा लिहिण्याकरिता काही येईल का, याचा विचार व्हावा.