...आता पावसाचे निमित्त !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 10:02 AM2021-12-03T10:02:26+5:302021-12-03T10:02:49+5:30
मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येपर्यंत विघ्नांची मालिका कायम आहे. संमेलन हे नाशकात की दिल्लीत येथून सुरू झालेली वादांची मालिका स्वागत गीतामध्ये सावरकरांचा टाळलेला उल्लेख, उद्घाटक म्हणून जावेद अख्तर यांना झालेला विरोध, विश्वास पाटील यांच्याविषयी रंगलेली चर्चा या मार्गे महापौरांचा रुसवा, विनायक मेटेंची टीका येथून अखेर पावसावर येऊन ठेपली.
- मिलिंद कुलकर्णी
(कार्यकारी संपादक, लोकमत, नाशिक)
मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येपर्यंत विघ्नांची मालिका कायम आहे. संमेलन हे नाशकात की दिल्लीत येथून सुरू झालेली वादांची मालिका स्वागत गीतामध्ये सावरकरांचा टाळलेला उल्लेख, उद्घाटक म्हणून जावेद अख्तर यांना झालेला विरोध, विश्वास पाटील यांच्याविषयी रंगलेली चर्चा या मार्गे महापौरांचा रुसवा, विनायक मेटेंची टीका येथून अखेर पावसावर येऊन ठेपली. पूर्वी नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले संमेलन स्थळ स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या ‘भुजबळ नॉलेज सिटी’ या शहरापासून दहा कि.मी. अंतरावर असलेल्या शैक्षणिक संस्थेत हलविण्यात आले. त्याचवेळी साहित्य रसिकांनी नाराजी व्यक्त केली होती. एवढ्या लांब जाणार कोण, असा रास्त सवाल विचारला गेला. अर्थात सगळ्या आजारांवर रामबाण औषध संयोजकांकडे असल्याच्या थाटात महापालिकेच्या बससेवा, काही खासगी गाड्यांच्या माध्यमातून रसिकांना संमेलनस्थळी नेले जाणार असल्याचे सांगण्यात आले. या सेवेची कार्यक्षमता किती हा प्रश्न आहेच. रसिकांची उपस्थिती रोडावली तर संमेलनस्थळ बदलामुळे घडले, असा ठपका येण्याची भीती संयोजकांना होती. मात्र, पाऊस धावून आला. पूर्वसंध्येपर्यंत नाशिकचे वातावरण एखाद्या थंड हवेच्या ठिकाणासारखे झाले आहे. संमेलनाच्या तीन दिवसांत नाशिक आणि नजीकच्या येणाऱ्या साहित्य रसिकांची पावसामुळे गैरसोय होण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी येण्याचे टाळले तर मात्र रसिकांची संख्या रोडावेल. संमेलनात उत्कृष्ट कार्यक्रमांचे नियोजन केलेले आहे. या कार्यक्रमांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला तर त्यात सहभागी होणाऱ्या साहित्यिक, कलावंतांचा उत्साह दुणावतो. रसिकांच्या उपस्थितीसाठी फार काही प्रयत्न झालेले आहेत, असे दिसले नाही. नाशिक जिल्ह्यात असलेल्या साहित्य, सांस्कृतिक संस्थांनादेखील यात सहभागी करून घेतले नसल्याने तेदेखील पाठ फिरविल्याशिवाय राहणार नाहीत. एकंदर गर्दी रोडावली तर निमित्त पावसाचे होईल. संयोजक सहीसलामत सुटतील.