कर्नाटकच्या गृहमंत्र्यांच्या 'त्या' विधानानं बेळगावातील मराठी भाषिक संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 06:16 PM2019-10-19T18:16:05+5:302019-10-19T18:18:32+5:30
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या भूमिकेकडे लक्ष
बेळगाव: महाराष्ट्र एकीकरण समिती कर्नाटक राज्योत्सवदिनी काळा दिन पाळते, ही मोठी चूक आहे असे वक्तव्य कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांबरा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना केले. बोम्मई यांच्या वक्तव्याने मराठी भाषिक जनतेत संतापाची लाट उसळली आहे. आता समिती याला काय प्रत्त्युत्तर देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
ज्या राज्यात राहतात तेथेच काळा दिन पाळायचे हे काही बरोबर नाही. अधिकाऱ्याकडून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काळ्या दिनाबाबत माहिती मागवली आहे. यापूर्वी देखील बेळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री असतानादेखील समितीच्या काळ्या दिनाबाबत जी काही कारवाई करायची ती केलेली आहे. आताही पोलीस अधिकाऱ्यांकडून अहवाल आल्यावर लगेच योग्य ती कारवाई करणार आहे. कायदा सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील, असे बोम्माई म्हणाले.
महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील पाण्याच्या वादावर तोडगा निघत आहे. मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री याबाबत महाराष्ट्राशी बोलणी करून योग्य निर्णय घेणार आहेत असे बोम्माई यांनी सांगितले.