केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून मराठवाड्याचा अपेक्षाभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 02:17 AM2018-02-12T02:17:59+5:302018-02-12T02:18:25+5:30
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री जे. पी. नड्डा यांच्या औरंगाबाद दौ-यात मराठवाड्याच्या पदरात काहीतरी नवीन पडेल, अशी अपेक्षा होती.
औरंगाबाद : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री जे. पी. नड्डा यांच्या औरंगाबाद दौ-यात मराठवाड्याच्या पदरात काहीतरी नवीन पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र अर्थसंकल्पातील तरतुदी आणि सुरू असलेल्या प्रकल्पांविषयी माहिती देण्यापलिकडे त्यांनी कोणतीही नवी घोषणा केली नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांकडून अपेक्षाभंग झाल्याची चर्चा होती.
या शासकीय कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा देण्यात आला असून संस्थेचे भूमिपूजन आणि भाभा ट्रॉन-२ युनिटचे उद्घाटन रविवारी नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे शैक्षणिक संचालक डॉ. कैलास शर्मा, वैद्यकीय शिक्षण सचिव संजय देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते.
नड्डा या वेळी म्हणाले की, कर्करोगाच्या दृष्टीने सरकारने दूरवर विचार केला आहे. ५० टर्शरी केअर सेंटरपैकी एक मराठवाड्यातील लातूरमध्ये होत आहे. २० राज्य कर्करोग संस्थांपैकी एक औरंगाबादेत आहे. स्वच्छ भारतसह आरोग्यदायी भारत होईल, यादृष्टीने वाटचाल सुरू आहे.
वैद्यकीय महाविद्यालयातील जागांत वाढ
देशभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत पदवीच्या १० हजार, तर ‘पीजी’च्या ८ हजार ५०० जागा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबच जिल्हा रुग्णालयांचे विस्तारीकरण करून ५८ वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येत आहेत. यामध्ये गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालयात रुपांतर करण्यासाठी १८९ कोटी रुपये दिले जात असल्याचे नड्डा यांनी या वेळी सांगितले.