मराठवाड्यासह महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर फेल, मतदारांचा महायुतीला भक्कम पाठिंबा...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 01:08 PM2024-11-23T13:08:27+5:302024-11-23T13:09:09+5:30
Marathwada Jarange Factor : विधानसभा निवडणुकीत महायुती बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे.
Marathwada Jarange Factor : अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागत आहेत. एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरवत महायुतीने राज्यात बहुमत मिळवले आहे. विशेष म्हणजे, महायुतीने 200 चा आकडा पार केला असून, भाजप सर्वाधिक 125-130 जागांवर जिंकण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, मराठवाड्यातदेखील महायुतीला चांगले यश मिळताना दिसत आहेत. मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनामुळे महायुती विशेषतः भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण महाराष्ट्रासह मराठवाड्यातही जरांगे फॅक्टर चालला नसल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. मराठवाड्यातील बहुतांश जागांवर महायुतीने मुसंडी मारली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मराठवाड्यासह राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. मराठा आरक्षणामुळे संपूर्ण मराठा समाज भाजपच्या विरोधात गेल्याचे चित्र पाहायला मिळत होते. खासकरुन लोकसभा निवडणुकीत याचा भाजपसह महायुताला सर्वाधिक फटका बसला. विधानसभा निवडणुकीतदेखील मराठा आरक्षण आणि जरांगे फॅक्टरचा महायुतीला फटका बसेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण, आजच्या निकालाने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे.
आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यातून महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्याचे दिसून येत आहे. महायुतीने आणलेली लाडकी बहीण योजना, योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे आणि पीएम मोदींच्या एक है तो सेफ है, या नाऱ्यांनी संपूर्ण हिंदू एकवटला आणि महायुतीला भरभरुन मतदान दिले. दरम्यान, लोकसभेप्रमाणे यंदाही मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण मराठवाड्यातील 46 जागांपैकी 36 जागांवर महायुती आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. आता आजच्या निकालानंतर मनोज जरांगे यांची पुढील दिशा काय असेल? हे पाहणे महत्वाचे आहे.