मुंबई: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 34 दिवसांनंतर ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सोहळा आज पार पडला. विधानभवन परिसरात महाविकास आघाडीचे 36 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मराठवाड्याला सात मंत्रिपदे मिळाली आहेत.
मराठवाड्यातील सात जणांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून संदीपान भुमरे यांची कॅबिनेट मंत्रिपदी तर अब्दुल सत्तार यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. तर नांदेडमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना सुद्धा कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. तसेच लातूर जिल्ह्यातून अमित देशमुख यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपदाची तर उदगीर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांची राज्यमंत्री पदावर वर्णी लागली आहे.
त्याचप्रमाणे बीडमधून धनंजय मुंडे यांना सुद्धा कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. तर जालन्यातून राजेश टोपे यांनी सुद्धा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे भविष्यात मराठवाड्याचा विकासात भर पडणार असल्याचे बोलले जात आहे.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, काँग्रेसच्या दिवंगत नेते विलासराव देशमुख आणि शिवाजीराव निलेंगेकर या नेत्यांनी सत्तेत असो किंवा विरोधात, नेहमीच मराठवाड्याचा विकासासाठी आवाज उठवला असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र त्यांनतर मराठवाड्यात अशोक चव्हाण आणि पंकजा मुंडे या दोन नेत्यांवेतिरिक्त सक्षम असा मंत्रीपदाचा चेहरा पाहायला मिळाला नाही. मात्र आता पुन्हा मराठवाड्याचा पारड्यात एकाचवेळी 7 मंत्रिपदे पडली असल्याने याचा फायदा मराठवाड्याला होणार असल्याचे बोलले जात आहे.