मंगळ ग्रह दोन तास लपणार चंद्राआड!, दुर्मीळ खगोलीय घटना घडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 12:59 AM2021-04-13T00:59:52+5:302021-04-13T01:00:16+5:30
Mars : येत्या १७ एप्रिल रोजी मंगळ ग्रह सुमारे दोन तास चंद्रबिंबाआड लपण्याची एक दुर्मीळ खगोलीय घटना घडणार आहे.
अकोला : आकाशात चंद्र, सूर्य यांच्या ग्रहणाचा आनंद अर्थात निसर्गातील हा सावल्यांचा खेळ आपण अधूनमधून अनुभवतो. मात्र, आता खगोलप्रेमींना सूर्यमालेतील लाल ग्रह असलेल्या मंगळाच्या बाबतीत अशीच एक मेजवानी मिळणार आहे. येत्या १७ एप्रिल रोजी मंगळ ग्रह सुमारे दोन तास चंद्रबिंबाआड लपण्याची एक दुर्मीळ खगोलीय घटना घडणार आहे.
शहरातील एक खगोलप्रेमी प्रा. प्रभाकर दोड यांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली. या अनोख्या खगोलीय घटनेचा रोमांचकारी अनुभव सगळ्या आकाशप्रेमींनी घ्यायलाच हवा, असे ते म्हणाले.
असा दिसेल नजारा...
- पश्चिम आकाशात घडून येणारा हा आकाश नजारा सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी सुरू होईल. त्यावेळी सूर्य आकाशात असल्यामुळे हे मनोहारी दृश्य जसजसा संधी प्रकाश कमी होत जाईल, तसतसे अधिक ठळकपणे दिसून येईल.
- ७ वाजून ४५ मिनिटांनी लाल रंगाचा मंगळ ग्रह चंद्रबिंबाआडून बाहेर आलेला दिसेल. सूर्यमालेत पृथ्वीनंतर येणारा मंगळ ग्रह सध्या काहीसा दूर असला तरी अंधारलेल्या भागातून हा आकाश नजारा द्विनेत्री वा दुर्बिणीच्या माध्यमातून बघता येईल, असे प्रा. दोड यांनी सांगितले.