भूषण रामराजे , नंदुरबारदेशभरात दोन दिवसांपूर्वीच भारताचा ६९वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला असताना अजूनही देशाच्या दुर्गम भागात अज्ञान व अंधश्रद्धेचा पगडा कायम असल्याची संतापजनक घटना नंदुरबारमध्ये उघड झाली आहे. कुष्ठरोग संसर्गजन्य असल्याच्या अज्ञानातून रोझवा गावातील वृद्ध महिलेवर गावकऱ्यांनी सामूहिक बहिष्कार टाकला आहे. ही असहाय महिला गावाबाहेर एका झोपडीत विपन्नावस्थेत राहत आहे. मात्र निर्ढावलेली सरकारी यंत्रणा याबाबत अनभिज्ञ आहे. सरदार सरोवर प्रकल्पबाधितांच्या साडेतीन हजार लोकवस्तीच्या तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन वसाहतीमधील सत्तर वर्षीय वेस्तीबाई यांना वर्षभरापूर्वी कुष्ठरोग झाल्याचे निष्पन्न झाले़ त्यांनी वसाहतीच्याच प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सहा महिने उपचार घेतले. मात्र नंतर उपचाराअभावी त्यांचा आजार बळावला़ पायाची सर्व बोटं गळून पडली़ काही दिवसांनंतर हाताची बोटेही गळाली़ त्यातच हा आजार संसर्गजन्य असल्याची आवई गावात उठली आणि गावाबाहेरील हाडंबा रस्त्याच्या बाजूला गावकऱ्यांनी त्यांच्यासाठी झोपडी तयार केली. वेस्तीबाईवर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याने त्या सहा महिन्यांपासून गावाबाहेर झोपडीत राहत आहेत़ त्यांना मूलबाळ तसेच कोणीही नातेवाईक नाही. गावातील एका कुटुंबाची गुरे त्या चरायला नेतात. त्यातून त्यांना महिन्याला केवळ शंभर रुपये मिळतात़ अन्नासाठी त्यांना दारोदार भटकावे लागत आहे. तरुण वयातच वैधव्य आलेल्या वेस्तीबार्इंच्या पाठीशी उभं राहणारं आज कोणीही नाही़ कधी शेतीची राखण, कधी गुरे चारणे, तर कधी रात्रीच्या वेळी जागल्याची कामे करणाऱ्या वेस्तीबाई विपन्नावस्थेत जीवन कंठत आहेत.आरोग्य विभागाला त्यांच्या आजाराबाबतची माहिती असूनही त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलेले नाही़ दारिद्र्यरेषेखालील असूनही त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.
नंदुरबारमध्ये कुष्ठरोगी महिलेवर सामूहिक बहिष्कार !
By admin | Published: August 18, 2015 12:58 AM