अन् भर सभेत 'बाळासाहेब' म्हणाले होते, शिवसेना सोडून जाणाऱ्या आमदाराला...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 12:54 PM2019-11-17T12:54:53+5:302019-11-17T13:08:52+5:30
आमदार फोडाफाडीच्या मुद्यावरून बाळासाहेबांनी केलेल्या एका भाषणाची एक क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.
- मोसीन शेख
मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज (रविवार) सातवा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांच्या वेगवेगळ्या भाषणांमधून, विचारांतून शिवसैनिकांना, मराठी माणसाला कायम स्फूर्ती मिळत राहते. त्यांच्या भाषणाचा असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. शिवसेना सोडून जाणाऱ्या आमदाराला भर रस्त्यातच तुडवून काढा असे सभेत बोलताना बाळासाहेब म्हणाले होते.
राज्यात सुरु असेल्या सत्ता संघर्ष पाहता सर्वच पक्षांसमोर आपले आमदारांना सांभाळण्याचे मोठे आव्हान आहे. त्यातच ईतर पक्षातील आमदार आपल्या संपर्कात असल्याचे दावे सुद्धा अनेक पक्षांकडून करण्यात येत असल्याने, आमदार फोडाफाडीच्या राजकीय घडामोडींच्या चर्चेला वेग आला आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचे आमदार फुटणार नाही याची काळजी सर्वच पक्षाकडून घेण्यात येत आहे.
तर याच पार्श्वभूमीवर आमदार फोडाफाडीच्या मुद्यावरून बाळासाहेबांनी केलेल्या एका भाषणाची एक क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. एका सभेत बाळासाहेब ठाकरे हे बोलत असताना म्हणाले होते की, काही जन शिवसेना पक्षाच्या तिकीटावर निवडून येतात आणि नंतर दुसऱ्या पक्षात जातात. जर सत्ता आली आणि त्यांनतर शिवसेनेचे एकही आमदार दुसऱ्या पक्षात गेला, तर त्याला भर रस्त्यातच तुडवा. विशेष म्हणजे हे काम महिला शिवसैनिकांनी योग्य पद्धतीने बजवावा, असे बाळासाहेब ठाकरे हे म्हणाले होते.