टोलसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
By admin | Published: May 22, 2015 01:22 AM2015-05-22T01:22:30+5:302015-05-22T01:22:30+5:30
शहरांतर्गत आकारल्या जाणाऱ्या टोलप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी बैठक बोलावली असून सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने चर्चेचे निमंत्रण स्वीकारले आहे.
कोल्हापूर : शहरांतर्गत आकारल्या जाणाऱ्या टोलप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी बैठक बोलावली असून सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने चर्चेचे निमंत्रण स्वीकारले आहे.
विशेष म्हणजे, या टोलला राज्य सरकारने सुचविलेला पर्याय कृती समितीने स्पष्टपणे उधळून लावला आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सर्वपक्षीय कृती समितीचे २० निवडक सदस्य यांच्यात बैठक होणार आहे. सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला नाही तर त्याच दिवशी त्याच ठिकाणी आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे कृती समितीतर्फे सांगण्यात आले.
मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल
माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी बुधवारी सर्वपक्षीय कृती समितीवर टीका केली होती. त्यासंदर्भात विचारणा केली असता प्रा. एन. डी. पाटील यांनी मुश्रीफ यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला. आम्ही कोणालाच विकलो गेलेलो नाही, पण हसन मुश्रीफ तुम्ही कोणाला विकला गेला आहात, ते आधी तपासून पाहा, अशी टीका पाटील यांनी केली. (प्रतिनिधी)
सरकारसोबत चर्चेला जातोय याचा अर्थ आम्ही टोलचा कोणताही पर्याय स्वीकारलेला नाही अथवा स्वीकारणारही नाही. कोल्हापुरातून सर्व टोलनाके उचलून नेले पाहिजेत, यावर आम्ही अद्यापही ठाम आहोत.
- प्रा. एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते,
सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समिती