‘मेघंकराचा राजवाडा’ नामशेष होण्याचा मार्गावर!
By admin | Published: August 15, 2015 01:18 AM2015-08-15T01:18:14+5:302015-08-15T01:18:14+5:30
पैनगंगा नदीच्या काठावरील ‘मेघंकराचा राजवाड्या’ची पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे दैन्यावस्था झाली आहे. त्याची देखभाल व दुरुस्तीमध्ये प्रचंड उदासीनता दाखवली जात आहे.
- ब्रह्मानंद जाधव, मेहकर
पैनगंगा नदीच्या काठावरील ‘मेघंकराचा राजवाड्या’ची पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे दैन्यावस्था झाली आहे. त्याची देखभाल व दुरुस्तीमध्ये प्रचंड उदासीनता दाखवली जात आहे. मेघंकराच्या राजवाड्यातील यज्ञशाळा पूर्णत: नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरला पौराणिक व ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न वारसा लाभला आहे. मेहकर नगरीचा ब्रह्मांड पुराणात ^‘मेघंकर’ असा उल्लेख आहे. या नगरीत पूर्वी सोन्याचे खांब असलेले वाडे असल्याचे वैभवशाली वर्णन ब्रह्मपुराणात आहे. त्याचप्रमाणे मेहकरला यज्ञभूमी मानले गेल्याचा उल्लेख मत्स्यपुराणात आहे. शुद्ध तूप यज्ञात अर्पण करणारी नदी म्हणून पैनगंगेचा उल्लेख आहे. म्हणून पैनगंगेच्या काठी मोठ्या संख्येने मंदिरे व यज्ञकुंडे आहेत.
मेघंकर राजाच्या राजवाड्यातील यज्ञशाळा असल्याची आख्यायिका आहे. पुरातत्त्व विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने, या यज्ञशाळेच्या ६० दगडी स्तंभांपैकी सध्या केवळ २५ स्तंभच उरले आहेत. या प्रत्येक स्तंभावर कोरीव कामाची अप्रतिम कलाकुसर आहे. त्यातील काही स्तंभ आजही मोठ्या दिमाखात उभे असून, पुरातन वैभवाची साक्ष देत आहेत.
परंतु पुरातत्त्व विभागाचे याकडे असेच दुर्लक्ष होत राहिल्यास, पुढच्या पिढीला पाहण्यासाठी राजवाड्याचे अवशेषही शिल्लक उरणार
नाहीत.
पुरातत्त्व विभागाचा फलकही गंजला!
ही पुरातन वास्तू, पुरातत्त्व विभागाच्या वतीने १९५८च्या प्राचीन स्मारके, पुरातत्त्वीय स्थळे व अवशेष अधिनियमान्वये राष्ट्रीय महत्त्वाची म्हणून घोषित करून, ताब्यात घेण्यात आली आहे. यासंदर्भात ‘संरक्षित स्मारक’ या आशयाचा फलक वास्तूबाहेर लावून, स्मारकाशी छेडछाड करण्यास नागरिकांना मनाई करण्यात आलेली आहे; परंतु प्रत्यक्षात या वास्तूचे संरक्षण तर दूरच, ‘संरक्षित स्मारक’ या आशयाच्या फलकालाच ‘गंज’ चढला आहे.
याच नदीच्या काठावर वसलेली पुरातन वास्तू (मढ) ही मेघंकर राजाच्या राजवाड्यातील यज्ञशाळा असल्याची आख्यायिका आहे. राजवाड्याच्या मधल्या भागात
२३ फुटांचे भव्य यज्ञकुंड असून, दक्षिण बाजूच्या गावकोटाशेजारी विटांपासून बांधलेला मोठा दरवाजा होता. त्यावरील कमानीवर एक शीलालेखही आहे.