गुणी बैलाची समाधी; सहा वर्षांपासून केला जातो पुण्यतिथी सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 09:04 PM2018-08-13T21:04:18+5:302018-08-13T21:38:32+5:30
घरधनी दारू पिऊन आला की, दावणीला बांधलेला ‘राजा’ त्याच्या अंगावर धावून जाई, त्याला अजिबात जुमानेसा होई. राजाच्या या वागण्याचा धसका घेऊन मालकाने चक्क दारूच सोडली.
- अमर गायकवाड
वडशिंगे (ता. माढा, जि. सोलापूर) : घरधनी दारू पिऊन आला की, दावणीला बांधलेला ‘राजा’ त्याच्या अंगावर धावून जाई, त्याला अजिबात जुमानेसा होई. राजाच्या या वागण्याचा धसका घेऊन मालकाने चक्क दारूच सोडली. काही वर्षांपूर्वी दारूचे व्यसन सोडविणाऱ्या आपल्या या बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रिधोरे येथील शेतक-याने त्याची समाधी बांधली. तसेच त्याची पुण्यतिथी पाळली जाते.
बैलजोडीने धनाजी गायकवाड यांना खूप काही मिळवून दिले. त्यांना दारुचे व्यसन होते. धनाजी दारू पिऊन यायचे, तेव्हा बैलजोडीपैकी राजा या बैलाच्या स्वभावात, हालचालीत फरक दिसायला. दारू प्यायल्यानंतर ‘राजा’ त्यांना जवळ येऊ देत नसे. त्यांच्या अंगावर धावून जात असे. हा प्रकार घरच्यांना समजला. ‘आता तरी दारु सोडा’ असा सल्लाही कुटुंबीयांनी त्यांना दिला. त्यामुळे ‘राजा’साठी दारू सोडण्याची शपथ धनाजी यांनी घेतली. त्यांनी दारू सोडली आणि राजा पुन्हा त्यांच्या हुकुमात आला.
‘राजा’ने निरोप घेतला...
दारूचे व्यसन सुटले, घरातील वातावरण आनंदी झाले अन् धनाजी बैलगाडीतून पंढरपूरला वारीला जाऊ लागले. मात्र सहा वर्षांपूर्वी ‘राजा’चा अचानक मृत्यू झाला. ‘राजा’चा तिसरा, चौथा विधी आटोपून धनाजी यांनी ‘राजा’ची समाधी बांधली. गेल्या ६ वर्षांपासून धनाजी आणि त्यांचे कुटुंबीय ‘राजा’ची पुण्यतिथी पाळतात. घरापासून समाधीपर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात काढण्यात येते. नुकतीच कथा, कीर्तनाने राजाची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.