मुंबई: सर्वसामान्य माणूस घराचं स्वप्न करण्यासाठी ज्या आशेवर असतो, त्या म्हाडाची लॉटरी लवकरच जाहीर होणार आहे. आचारसंहिता लागू होण्याआधी म्हाडाची लॉटरी निघणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिकमधील घरांचा समावेश असेल. तर औरंगाबादमधील घरांसाठी आचारसंहितेनंतर लॉटरी काढली जाईल. मुंबई, पुणे आणि नाशिकमधील घरांसाठी येत्या काही दिवसांमध्ये म्हाडाच्या लॉटरीची तारीख जाहीर होऊ शकते. यामुळे अनेकांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. राज्य सरकार आचारसंहिता लागू होण्याआधी म्हाडाची लॉटरी काढणार आहे. यामध्ये मुंबईतील 238 घरं आणि 107 गाळ्यांचा समावेश असेल. म्हाडा पुणे, नाशिक आणि औरंगाबादमधील घरांसाठीही लॉटरी काढणार आहे. पुण्यातील 4464, नाशकातील 1 हजार आणि औरंगाबादमधील 800 घरांसाठी म्हाडाकडून लॉटरी काढली जाईल. आचारसंहिता लागू होण्याआधी लॉटरी काढली जाणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली. कोकण विभागातही 9 हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. ही घरं डोंबिवली, खोणी, अंतरर्ली परिसरातील असतील. मुंबईच्या तुंगा परिसरातील घरांच्या किमती कमी होणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. म्हाडाचा कर थकवलेल्या खासगी बांधकाम व्यावसायिकांविरोधात खटला दाखल केला जाणार असल्याचं सामंत म्हणाले. खासगी बांधकाम व्यावसायिकांनी म्हाडाचा 130 कोटींचा कर थकवला आहे.
आचारसंहितेआधी सरकार काढणार म्हाडाची लॉटरी; सत्तेच्या स्वप्नपूर्तीसाठी गृहस्वप्नाला गती?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 4:00 PM