मुंबई : औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत ९८४ सदनिका व २२० भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांच्या हस्ते मंगळवारी ‘गो-लाईव्ह’ कार्यक्रमांतर्गत या प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ‘शिवगड’ या शासकीय निवासस्थानी ‘गो-लाईव्ह’ कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी सोडतीची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. ती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासाठी २४ मेपर्यंत अर्ज नोंदणी करता येईल, तर अर्ज करण्यासाठी २५ मेच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अनामत रकमेच्या ऑनलाईन स्वीकृतीकरिता २६ मे रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदत असून, २७ मेपर्यंत अनामत रकमेचा भरणा करता येईल, असे म्हाडाकडून सांगण्यात आले.
प्रधानमंत्री आवास योजना (नागरी)या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजना(नागरी)अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३३८ सदनिका आहेत. त्यात लातूर एमआयडीसी येथील ३१४, सिरसवाडी रोड जालना येथील १८ सदनिका आणि औरंगाबादच्या नक्षत्रवाडी येथील ६ सदनिकांचा समावेश आहे.
कुठे किती घरे? अत्यल्प उत्पन्न गटासाठी भोकरदन येथे २७ भूखंड व २ सदनिका, अंबड येथे ६ सदनिका, सिरसवाडी रोड येथे ३८ सदनिका. मध्यम उत्पन्न गटासाठी भोकरदन ९ भूखंड, हिंगोली येथे १६ सदनिका, टोकवाडी येथे ५३ भूखंड, औरंगाबाद येथील गृहनिर्माण भवनाजवळ ४ सदनिका, देवळाई येथे २ सदनिका, नळदुर्ग येथे १९ भूखंड.
येथे निघणार सोडत२ जूनला दुपारी १ वाजता स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी म्हाडाच्या संकेतस्थळावर केली जाईल. सदनिका वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत १० जून २०२२ रोजी सकाळी ११ वाजता औरंगाबाद येथील ‘मराठवाडा महसूल प्रबोधिनी सभागृहा’त काढली जाईल.