‘म्हैसाळ’चा वीज पुरवठा खंडित होणार!

By admin | Published: May 11, 2015 11:42 PM2015-05-11T23:42:33+5:302015-05-11T23:48:41+5:30

महावितरणचे पत्र : पावणेसहा कोटीची थकबाकी; पाणीपट्टी भरण्याकडेही दुर्लक्ष

'Mhaysal' power supply will break! | ‘म्हैसाळ’चा वीज पुरवठा खंडित होणार!

‘म्हैसाळ’चा वीज पुरवठा खंडित होणार!

Next

सांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या विद्युत बिलाची थकबाकी पाच कोटी ७० लाखापर्यंत गेली आहे. ही थकबाकी आठवड्यात न भरल्यास योजनेचा वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. महावितरणकडून म्हैसाळ योजनेकडील अधिकाऱ्यांना तसे पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे जत, मिरज, कवठेमहांकाळ आणि सांगोला तालुक्यातील शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
म्हैसाळ उपसा सिंचन योजना कायम कार्यान्वित ठेवण्यासाठी प्रशासन आणि शेतकऱ्यांकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. मध्यंतरी साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन थकित पाणीपट्टी वसुलीसाठी पुढाकार घेतला होता. पण, त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे सध्या पुन्हा थकित पाणीपट्टी आणि वीज बिलाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, जत आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राला होणार आहे.
मुख्य कालव्यासह पोटकालव्यांची कामे पूर्ण झाली नसल्यामुळे, योजनेच्या कार्यक्षेत्रातील ४० टक्के क्षेत्रालाच अप्रत्यक्षरित्या त्याचा लाभ होत आहे. यामुळेच पाणीपट्टी वसुलीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मध्यंतरी अधिकारी, काही साखर कारखानदारांनी प्रयत्न केल्यानंतर लाभार्थ्यांकडून फक्त १ लाख ८० हजार रुपयांची वसुली झाली आहे.
मागील चार-पाच वर्षांतील थकित पाणीपट्टीचा आकडा १५ कोटींपर्यंत पोहोचला आहे, तर ५ कोटी ७० लाखांचे थकित वीज बिल आहे. पाणीपट्टी वसुली आणि थकित वीज बिल याचे प्रत्यक्ष गणित कुठेच जमत नाही.
दुसऱ्या बाजूला महावितरण कंपनीकडून थकित वीज बिल वसुलीसाठी तगादा लावला आहे. पाणीपट्टी जमा झाली नाही, तर कोणत्याहीक्षणी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यापूर्वीच या परिसरातील शेतकरी आणि राज्यकर्त्यांनी थकित पाणीपट्टीचा प्रश्न निकालात काढला नाही, तर उन्हाळी पिके वाळतील, अशी परिस्थिती आहे. (प्रतिनिधी)

योजनेची सद्यस्थिती
थकित पाणीपट्टी : १५ कोटी
एकूण थकित वीज बिल : ५ कोटी ७० लाख
पुणे आयुक्तालयाकडून शासनाने भरलेली रक्कम : १ क ोटी ६२ लाख
म्हैसाळ योजनेची यंदाची महिन्याभरातील वसुली फक्त १ लाख ८० हजार
‘म्हैसाळ’चे एकूण लाभक्षेत्र : एक लाख हेक्टर
पाण्याचे मागणी अर्ज दाखल केवळ : २६१ हेक्टर क्षेत्र

Web Title: 'Mhaysal' power supply will break!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.