- मनोहर कुंभेजकरमुंबई- सध्या देशातील वातावरण बघता दोन महिन्यांत देखील निवडणुका लागू शकतात, असे भाकीत राज्यसभा खासदार व शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज रात्री दिंडोशीत काढले. न्यू दिंडोशीच्या रॉयल हिल्स सोसायटीत खासदार संजय राऊत यांच्या फंडातून साकारलेल्या सुसज्ज क्रीडांगण आणि व्यायामशाळेचा लोकार्पण सोहळा आज रात्री त्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.आपल्या भाषणात दिंडोशीचे आमदार व विभागप्रमुख सुनील प्रभू यांनी अजून आमदारकीच्या निवडणुकीला दोन वर्षे बाकी आहे. त्यामुळे येथील विकासकामांसाठी आपला खासदार निधी द्यावा अशी मागणी केली असता, हा धागा पकडून दोन वर्षे काय घेऊन बसलात. दोन महिन्यात देखील निवडणुका होतील, असे भाकीत त्यांनी वर्तवले. आमदार प्रभू यांनी दिंडोशीचा विकास चांगल्या पद्धतीने केला असून, येथे आल्यावर सुंदर रस्ते, उंच इमारती आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत हा भाग असल्यामुळे असणारी शुद्ध हवा पाहता दिंडोशीत तर मलबार हिल, वाळकेश्वर, बीकेसीत आल्यासारखेच वाटते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. महाराष्ट्राचा निकाल काहीही लागो, मात्र दिंडोशीत भगवा फडकणारच, असा ठाम विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.यावेळी मंचकावर महिला विभागसंघटक व नगरसेविका साधना माने, स्थापत्य समिती अध्यक्ष(उपनगरे) व स्थानिक नगरसेवक तुळसीराम शिंदे, विधी समिती अध्यक्ष अॅड.सुहास वाडकर, माजी नगरसेवक सदाशिव पाटील, न्यू दिंडोशी रॉयल हिल्स को-ऑप-हाऊसिंग सोसायटीचे सचिव अजित जठार आदी मान्यवर उपस्थित होते. येथील सुसज क्रीडांगण आणि व्यायामशाळा या दोन्ही वास्तूंची देखभाल करण्याची जबाबदारी न्यू दिंडोशी रॉयल हिल्स को- ऑप सोसायटीकडे सोपवण्यात आली आहे. तसेच म्हाडाने यासाठी ' ना हरकत प्रमाणपत्र' दिले असून, हे क्रीडांगण १४ हजार चौरस फूट विस्तीर्ण असून व्यायामशाळेचे क्षेत्रफळ ५०० चौफूट आहे. येथील परिसरातील नागरिकांना याचा लाभ होणार असून त्यांना हक्काचे मोकळे क्रीडांगण आणि व्यायामशाळा मिळणार आहे, अशी माहिती जठार यांनी दिली.
दोन महिन्यांत होऊ शकतात मध्यावधी निवडणुका, शिवसेना खासदार संजय राऊतांचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 10:14 PM