दूध भुकटी उत्पादकांना ३ रु. लीटरमागे अनुदान; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 04:29 AM2018-05-09T04:29:51+5:302018-05-09T04:29:51+5:30
सहकारी व खासगी दूध भुकटी (मिल्क पावडर) उत्पादकांना प्रति लीटर दुधामागे तीन रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे दूध आंदोलनाची कोंडी फुटेल, अशी सरकारला आशा आहे.
- विशेष प्रतिनिधी
मुंबई : सहकारी व खासगी दूध भुकटी (मिल्क पावडर) उत्पादकांना प्रति लीटर दुधामागे तीन रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे दूध आंदोलनाची कोंडी फुटेल, अशी सरकारला आशा आहे.
मार्च २०१८ मध्ये उत्पादित केलेल्या दूध भुकटीपेक्षा किमान २० टक्के अतिरिक्त दूध भुकटी तयार करणाऱ्यांना आजच्या निर्णयाचा लाभ होणार आहे. शासन निर्णय काढल्याच्या दिनांकापासून पुढील ३० दिवसांच्या कालावधीसाठी हा निर्णय लागू असेल.
राज्यात सध्या दुधाचे अतिरिक्त उत्पादन झालेले आहे. मात्र, याच काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे दर घसरलेले आहेत. घसरलेल्या दरांमुळे कमी दूध भुकटी तयार करण्याकडे प्रकल्पधारकांचा कल असतो. तसेच दुधाची भुकटी निर्माण करणे परवडत नसल्याने प्रकल्पधारकांकडून कमी दराने दूध खरेदी करण्यात येते. याचा सरळ परिणाम दूध उत्पादक शेतकºयांच्या आर्थिक परिस्थितीवर होतो. त्यामुळे दूध भुकटी उत्पादकांना प्रोत्साहनपर अनुदान देऊन दूध खरेदीस चालना देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकºयांना आर्थिक दिलासा मिळणार असून अतिरिक्त उत्पादित दुधाचा विनियोगदेखील त्यामुळे शक्य होणार आहे.
साधारणपणे १०० लीटर दुधाचे रुपांतरण दूध भुकटी व लोणी यामध्ये करताना होणारा खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पन्नाचा विचार करता एकूण ३२४ रुपये ५५ पैसे इतका म्हणजेच प्रति लीटर दुधामागे ३ रुपये २४ पैसे इतका तोटा दूध भुकटी प्रकल्पधारकांना येतो. या पार्श्वभूमीवर ३ रुपये अनुदान देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे.
दूध पावडरवर शासनाने देऊ केलेल्या अनुदानाचा शेतकºयांना कुठलाही फायदा होणार नाही़ मग शेतकºयांना न्याय मिळाला, असे कसे म्हणता येईल़ त्यामुळे आंदोलन सुरूच राहणार आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी येत्या मे नंतर बैठक घेण्यात येईल़
- धनंजय धोरडे,
शेतकरी नेते, पुणतांबा
शासनाच्या या निर्णयामुळे दुधाला २७ रुपये भाव मिळू शकणार नाही़ त्यामुळे दूध उत्पादकांचे आंदोलन सुरूच राहील़
- गुलाबराव डेरे,
अध्यक्ष, दूध उत्पादक कल्याणकारी संघ